नवी मुंबईत बिल्डर राज कंदारी यांचा आत्महत्येचा प्रयत्न
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 10 May 2016 03:08 AM (IST)
नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रसिद्ध स्वराज बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे मालक राज कंदारी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सानपाडा येथील राहत्या घरी त्यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी घातली. जखमी अवस्थेत त्यांना वाशीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. राज कंदारी यांनी चेंबूर, ऐरोली, कोपरखैराणे, सानपाडा, उलवे, नवीन पनवेल येथे मोठे टॉवर उभारले आहेत. आर्थिक संकटातून आत्महत्या? राज कंदारी हे गेल्या काही दिवसापासून आर्थिक संकटात असल्याचे सांगितले जात आहे. नवीन पनवेल आणि उलवा इथे हाती घेतलेल्या प्रोजेक्टमध्ये त्यांचं मोठं नुकसान होत होते. पनवेलमधील वाकडी गावाजवळ 99 एकर परिसरात स्वराज लगुना हा राज कंदारी यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. मात्र या प्रोजेक्टला काही परवानग्या मिळत नव्हत्या. तर उलवा येथील होम प्रोजेक्टला काही राजकीय कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जात असल्याचे समजतं. मागील काही दिवसापासून राज कंदारी आर्थिक संकटात होते. त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही कामावरुन काढलं होतं. तर काहींचा पगार कमी केला होता. दरम्यान, राज कंदारी यांच्याशेजारी सुसाईड नोट सापडली आहे. मात्र यात त्यांनी कोणाच्याही नावाचा स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही. त्यामुळे आता राज कंदारी यांनी आत्महत्येचा केलेला प्रकार म्हणजे ठाण्यातील ' सूरज परमार' प्रकरण तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.