नाशिकः फ्लॅटधारकांच्या मालमत्ता तब्बल 23 वर्ष उलटूनही हस्तांतरीत करुन देत नसलेल्या बिल्डर दाम्पत्याला नाशिक पोलिसांनी मोफा अंतर्गत अटक केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र सदनिका हस्तांतर उल्लंघन कायद्यांतर्गत अशाप्रकारे झालेली ही जिल्ह्यातील पहिलीच, तर राज्यातली दुसरी कारवाई आहे.


 

नाशिक पोलीसांच्या या कारवाईमुळे बिल्डर लॉबीमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. बिल्डर साहेबराव कदम यांनी कॉलेज रोड येथे सन्मिज्ञ अपार्टमेंट ही इमारत 1993 साली बांधली होती. मात्र तब्बल 23 वर्षानंतरही कदम यांनी फ्लॅट हस्तांतरीत केले नव्हते.

 

कारवाईमुळे बिल्डर लॉबीचे धाबे दणाणले

 

महाराष्ट्र सदनिका हस्तांतर उल्लंघन कायदा म्हणजेच 'मोफा' खास बिल्डर लॉबिंगची मनमानी रोखण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत नाशिकमधील ही पहिलीच कारवाई आहे. त्यामुळे बिल्डर लॉबीचे सध्या धाबे दणाणले आहेत.

 

फ्लॅटधारकांनी कदम यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र कदम यांनी पत्नीच्या नावाने कागदोपत्री फेरफार करुन या इमारतीच्या जागी आयटी पार्क उभारणीसाठी महापालिकेकडे परवानगीचा अर्ज सादर केला होता.

 

घटनेचं गांभीर्य ओळखून इमारतीतील रहिवाशी संजीव बारवकर यांनी याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनीही कदम यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. कागदोपत्री सत्यता पडताळल्यानंतर पोलिसांनी कदम आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध 'मोफा' अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली. शनिवारी या बिल्डर दाम्पत्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आलं होतं.