निकीता आणि पूजा या बहिणींचं शिक्षण जोपर्यंत सुरु राहिल तोपर्यंत प्रत्येक वर्षीच्या दोघींच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी अलका कुबल यांनी उचलली आहे. निकीता दहावीत, तर पूजा आठवीत शिकत आहे.
निकिता 4 वर्षांची असताना वडिलांचं अपघाती निधन झालं. कणखर आईनं दोन्ही लेकींसोबत आई-वडिलांचं घर गाठलं. मोलमजुरी करुन घर चालत होतं. पण तितक्यात नियतीनं दुसरा धक्का दिला. निकिता आठवीत असताना त्यांची आईही गेली.
परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या उस्मानाबादच्या संघर्षकन्या
बहिणीसह घराची जबाबदारी निकीतावर आली. पण अवघ्या 13 व्या वर्षी निकितानं मोठा निर्णय घेतला. आधीच परिस्थितीशी झुंजणाऱ्या आजी-आजोबांवर ओझं न होण्याचा. या निर्णयासरशी निकितानं आपलं मूळ घर गाठलं. हा मोठा निर्णय निभावताना निकिताला छोट्या बहिणीच्या
शिक्षणाची आबाळ करायची नव्हती. त्यामुळे घरातलं प्रत्येक काम निकितानं आपल्या अंगावर घेतलं आहे.
बहिणीला शाळेत सोडून परतलेली निकिता पुन्हा कामं आवरुन आपल्या शाळेत जाते. दिवसभर शाळा... तीही आठवड्यातले तीन दिवस... उरलेले चार दिवस ती शेतात राबते. मजुरी करण्यापासून निकितानं बहिणीला दूर ठेवलं. वह्या पुस्तकं हातात धरायच्या वयात पोरीनं खुरपं जवळ केलं. मजुरीमुळे शाळेत खाडे पडू लागले. तिला शाळेतून काढणार असल्याचं शिक्षकांनी ठरवलं, पण पुढे परिस्थिती समजली आणि त्यांनी निर्णयापासून माघार घेतली.
निकिता मितभाषी आहे, पण पोरीला शिकायची उर्मी आहे. आयुष्यानं दुर्दैवाचं इतकं दान पारड्यात टाकलं. सुदैवाने तिला मैत्रिणी चांगल्या मिळाल्या. मैत्रिणी तिला गृहपाठाच्या वह्या देऊन मदत करतात.
नियतीनं अजाणत्या वयापासूनच या पोरांची परीक्षा पहायचं ठरवलं. नियती आपल्या पायात काटे पेरत आहे, याचं भानही या पोरांना नाही. ते फक्त वाट तुडवत आहेत. नव्या प्रकाशाच्या दिशेनं.