अहमदनगर : बीएसएफ जवान पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं समोर आहे. प्रकाश काळे असं या जवानाचं नाव असून तो मूळचा अहमदनगरमधील आहे. पाकिस्तानी महिला एजंटला बीएसएफची माहिती लिक केल्याचा आरोप या जवानावर आहे. पंजाब पोलिसांनी प्रकाश काळे याला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.


प्रकाश काळे हा सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफमध्ये कार्यरत आहे. नगर तालुक्यातील ससेवाडी इथला तो मूळचा रहिवासी आहे. 2019 पासून तो पंजाबमध्ये नियुक्तीवर आहे. पंजाब सीमेवर असताना त्याने पाकिस्तानी महिला एजंटला काही माहिती लिक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.


फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाश काळेचा एका पाकिस्तानी महिला एजंटसोबत संपर्क झाला. त्या महिलेने गोड आणि चांगलं बोलून जवानाला जाळ्यात अडकवलं. प्रकाश काळेने आपल्या सहकाऱ्यांच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये या पाकिस्तानी महिला एजंटला अॅड केलं. या ग्रुपद्वारे बीएसएफबद्दलची सर्व माहिती त्या महिलेला कळत होती. कोणाच्या नियुक्त्या कशा केल्या, कुठे झाल्या, कोण कुठे कार्यरत आहेत, याची माहिती तिला त्यातून मिळत होती.


ऑगस्ट 2020 पासून हा प्रकार सुरु होता. या संदर्भामध्ये माहिती मिळाल्यानंतर पंजाब पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. पंजाब पोलिसाच्या स्टेट ऑपरेशन सेलने त्याला अटक केली. त्याला कोर्टात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलीस त्याच्याकडून आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.


दरम्यान नुकतीच सुरक्षा दलाच्या जवानांच्या सोशल मीडियावरील वापरावर बंदी घालण्यात आली होती. पण जवान बंदी झुगारुन अशाप्रकारच्या जाळ्यामध्ये अडकत असल्याचं यावरुन समोर आलं आहे.


प्रकाश काळे हा गरीब कुटुंबातील आहे. गावात त्यांची फारच कमी जमीन आहे. हालखीच्या परिस्थितीत वडिलांनी प्रकाश काळेचं शिक्षण पूर्ण केलं. प्रकाशा काळे दहा वर्षांपूर्वी बीएसएफमध्ये सामील दाखल होता. तो या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं समजल्यानंतर गावकऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे.