कोल्हापूर : अनैतिक संबंधातून कोल्हापुरात एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बहिणीशी असलेले अनैतिक संबंध वारंवार सांगूनही तोडत नसल्याने महिलेच्या भावासह त्याच्या मित्राने 30 वर्षीय भरत कांबळे या तरुणाची हत्या केली.


 
महिलेचा भाऊ मनोज कांबळे आणि त्याचा मित्र विनायक माने यांनी भरत कांबळेची चाकून भोसकून दगडाने ठेचून हत्या केल्याचा आरोप आहे. मृत भरत आणि महिला हे पळून जाऊन लग्न करणार होते. त्याच दिवशी आरोपींनी भरतला रेल्वे स्टेशनवर गाठलं.

 

 

हातकणंगले तालुक्यातील माले या गावात राहणारा भरत दगडू कांबळे याचे एका विवाहित महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. हे त्या महिलेच्या नातेवाइकांना समजल्यावर महिलेचा पती आणि इतरांनी भरत कांबळे याची समजूत काढली होती. त्याला समजही दिली होती, मात्र भरतने चार-सहा महिने झाल्यानंतर पुन्हा त्या महिलेशी संबंध निर्माण केले.

 

या रागातून महिलेच्या पतीने तिला कोल्हापुरात माहेरी पाठवले होते. ही महिला आणि तिचा प्रियकर भरत कांबळे मोबाईलवरुन वारंवार संपर्क करत होते. तसेच कोल्हापुरात एकांतात भेटत होते. हे विवाहितेच्या पतीला समजले. ही बाब त्याने महिलेच्या नातेवाईकांना दिली.

 

गेल्या तीन महिन्यांपासून ही महिला माहेरी राहत होती, तर तिची दोन मुले पतीकडे गावी होती. विवाहित महिला आणि भरत कांबळे यांनी पुण्याला पळून जाऊन तिथं लग्न करायचं ठरवले होतं. मात्र या महिलेस आपला लहान मुलगा सोबत हवा होता. त्यामुळे शनिवारी दुपारी महिलेने आपल्या पतीला मोबाईलवर फोन करुन 'मला तुझ्याशी संसार करण्यात काहीच रस नाही. त्यामुळे मी आणि भरत पुण्याला पळून जाणार आहोत. मला माझा मुलगा हवा आहे. तू मुलीला ठेऊन घे. आज सायंकाळी पाच वाजता रेल्वे स्टेशनवर मुलाला घेऊन ये. मी तेथे वाट पाहते.' असा निरोप दिला.

 

 

विचारेमाळ परिसरात राहणारा भाऊ मनोज कांबळे आणि त्याचा मित्र विनायक माने हे दोघे बहिणीच्या पतीच्या घरी गेले. त्यांचा मोबाईल घेऊन कोल्हापुरात आले. सायंकाळी पाच वाजता पुण्याला पळून जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आलेल्या त्या महिलेने मोबाईलवरून संपर्क साधला असता तो  कॉल भाऊ मनोजने घेतला आणि ‘मी मुलास घेऊन आलो आहे. तेथेच थांब, येतो,’ असे सांगितले.

 

 

मनोज व विनायक हे दोघे रेल्वे स्टेशनवर गेले. प्रियकर भरत कांबळे याला दुचाकीवर घेऊन ते मध्यवर्ती बसस्थानकमार्गे कदमवाडी ते कसबा बावडा रोडवर रात्री उशिरा गेले. आरोपींनी झूम प्रकल्पाच्या बाजूला पाणंद रस्त्यावर भरत कांबळेला नेले. त्या ठिकाणी त्यांच्यात वादावादी झाली. संतापलेल्या मनोजने खिशातील सुरा काढून भरतच्या पोटात खुपसला. भरत रक्ताच्या थारोळयात खाली पडला, तेव्हा दोघांनी त्याच्या डोक्यात दगड घातला. भरत मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर दोघे हल्लेखोर तेथून निघून गेले.

 

 

घटनेनंतर आरोपी स्वत: शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाले. दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.