समन्यू भाटे आणि मैथिली भाटे या पुणेकर चिमुरड्यांसाठी आजचा गुढीपाडवा दुहेरी आनंद देणारा ठरला. पहिला आनंद होता तो सणाचा आणि दुसरा साक्षात ब्रेट लीच्या भेटीचा.
समन्यू आणि मैथिली या दोघांनाही लहाणपणापासून बहिरेपणाची व्याधी होती. पण वैद्यकीय उपचारांसह श्रवणयंत्रांच्या वापरानं ती व्याधी पूर्ण बरी झाली. दोघंही उत्तम ऐकू शकतात. त्याच कारणासाठी कॉक्लीयर श्रवणयंत्राच्या ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या ब्रेट लीनं दोघांची भेट घेतली. आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ब्रेट लीने 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतली आहे. ब्रेट लीने ऑस्ट्रेलियाकडून ७६ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३०.८१ च्या सरासरीने ३१० विकेट घेतल्या आहेत. तसंच २२१ वनडे सामन्यात २३.३६ च्या सरासतीने ३८० फलंदाजांना त्याने तंबूत धाडलं आहे. टी ट्वेण्टी या प्रकारातही ब्रेट लीने आपल्या गोलंदाजीची धार कायम ठेवत २५ सामन्यात १८ विकेट घेतल्या आहेत.