Breaking News LIVE : उजनीच्या जलाशयात शिवसेनेच्या संजय बाबा कोकाटे यांचं जलसमाधी आंदोलन
Breaking News LIVE Updates, 1 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पंढरपूर मध्ये बालकांच्या कोविड चाचण्या पॉझिटीव्ह येऊ लागल्याने आता लहान मुलांच्या कोविड हॉस्पिटलचा प्रस्ताव पुढे आला आहे . कोरोनाबाधित गरोदर महिला, प्रसूतीनंतर नवजात बालके आईचे दूध पिऊन कोरोना ग्रस्त होऊ लागलं आहेत . त्यामुळे अशा लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटलचा प्रस्ताव आला आहे
उजनीच्या पाण्यावरुन आज महाराष्ट्र दिनी उजनी जलाशयात पोलिसांना चकवा देत शिवसेनेच्या संजय बाबा कोकाटे यांनी जलसमाधी आंदोलन केलं. पुणे जिल्ह्यातील पाच टीएमसी सांडपाणी उजनी धरणातून इंदापूर तालुक्यात देण्याचा निर्णय झाला. यानंतर सोलापूर जिल्ह्यातून याला प्रचंड विरोध सुरु झाला असून सर्वपक्षीय नेत्यांनी यास विरोध करण्यास सुरुवात केली आहे. उजनी संघर्ष समितीसह अनेक संघटनांनी आज उजनी जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज शिवसेनेचे संजय बाबा कोकाटे यांनी आज पोलिसांना चकवा देत उजनी जलाशयात कार्यकर्त्यांसह जलसमाधी आंदोलन केलं.
नाशिकच्या इंदिरा गांधी रुग्णालयात गोंधळ झाला आहे. लस मिळत नसल्याने नागरिक आक्रमक झाले असून महापालिका रुग्णालयात पोलिसांना पाचारण करावं लागलं. कोवॅक्सिन लस उपलब्ध नसल्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्यांना लस मिळत नाही. इंदिरा गांधी रुग्णालयात आज केवळ 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.
पुण्यातील लसीकरण केंद्रावर आजही गोंधळ कायम आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी पुणे जिल्ह्यात 20 हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यात फक्त 19 केंद्र सुरु असून 2 केंद्र पुण्यात आहेत. त्यामध्ये कमला नेहरु रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय येरवडा येथे आजच्या दिवशी लसीकरण केलं जाणार आहे. शहरात एकूण 700 नागरिकांना लस दिली जाणार आहे. मात्र अनेकांनी नोंदणी केली असली तरी नियोजन केंद्र आणि वेळ निश्चित होत नसल्यानं लसीकरण केंद्रावर गोंधळ कायम असून नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
महाराष्ट्र दिनी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णवाढीचा दर घसरला आहे. 1 एप्रिल कोरोनाबाधित रुग्णांचं प्रमाण 20.85 टक्के होतं तर 29 एप्रिल रोजी रुग्णांचं प्रमाण 9.24 टक्क्यांवर आलं आहे.
जालना येथे राज्याचे आरोग्य मंत्री तथा राजेश टोपे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे ध्वजारोहण पार पडले, यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्ह्यातील ताजसीलदारांची उपस्थिती होती,यावेळी मुख्य कार्यक्रमानंतर पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आरोग्यमंत्र्यांनी सर्वांना काळजी घेण्याची विनंती करून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
औरंगाबाद रेमडेसिवीर चोरी प्रकरणी मनपा मुख्य फार्मासिस्ट रगडे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर कंत्राटी पद्धतीवरील सहायक फार्मासिस्ट प्रणाली कोल्हे यांच्या सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले आहे. महापालिका मुख्य प्रशासक आस्तिक पांडे यांनी हे आदेश दिले आहेत. शिवाय गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. मनपाच्या मॉट्रॉन कोविड केअर सेंटरमधून 48 रेमडेसिवीर इंजेक्शन गायब झाले होते.
ज्या झाडापासून ऑक्सिजन मिळतो ती झाडे येत्या पावसाळ्यात लावा. एक इंच ही जागा रिकामी रहायला नको. रोप बनविणे, लागवडीची तयारी आतापासूनच करा
बीडच्या जिल्हा रुग्णालयातून पुन्हा एकदा एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गुरुवारी (29 एप्रिल) रात्री नऊ वाजता मृत पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह कोविड वॉर्डमध्येच तसाच रॅप करुन ठेवण्यात आला. जवळपास 20 तास हा मृतदेह तिथेच ठेवल्याचं रुग्णांनी सांगितलं. जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग हॉस्टेलमधील कोविड वॉर्डमधील हा प्रकार घडला. हा मृतदेह या ठिकाणीच ठेवल्याने वॉर्डमधील रुग्णही भयभीत झाले होते. तब्बल 20 तासानंतर हा मृतदेह जिल्हा रुग्णालय प्रशासनाने बाहेर काढला.
औरंगाबाद रेमडेसिवीर चोरी प्रकरणात मनपाचे मनपा मुख्य फार्मासिस्ट रगडे यांचं निलंबन करण्यात आलं आहे तर कंत्राटी पद्धतीवरील सहायक फार्मासिस्ट प्रणाली कोल्हे यांची सेवा समाप्तीचे आदेश मनपा मुख्य प्रशासक आस्तिक पांडे यांनी दिले आहेत. या प्रकरणी त्यांनी गुन्हा ही दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मनपाच्या मॉट्रॉन कोविड केअर सेंटरमधून 48 रेमडेसिवीर इंजेक्शन चोरी झाले होते.
बुलढाण्यापासून 12 किमी अंतरावर खामगाव मार्गावरील वरवंड गावाजवळील ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या अस्वलाना आता जंगलात खाण्यासाठी काही नसल्याने आणि जंगलातील पाणवठेसुद्धा आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी अभयारण्याजवळ असलेल्या गावाकडे हे अस्वल वावरताना दिसत आहे. कालच या अस्वलाने एका हॉटेलात जेवण केलं तर मध्यरात्री या अस्वलाने जवळच असलेल्या एका मंदिरात दर्शन घेतलं आणि मंदिराचा दरवाजा देखील तोडला. जवळच्या शेतातील एका शेतकऱ्याने आपल्याजवळ असलेल्या टॉर्चच्या उजेडात मोबाईल कॅमेरात या अस्वलाला देवळात दर्शन घेताना कैद केलं.
मुंबईतल्या जोगेश्वरी इथल्या बेहराम परिसरात एका सहा वर्षीय मुलीवर तिच्या घरमालकाच्या मुलाने लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या सुनील गुप्ता या तरुणाला अटक देखील झाली. मात्र काल रात्री अचानक या विभागातील नागरिक आणि काही लोकप्रतिनिधींनी बेहराम बाग ते ओशिवरा पोलीस ठाणे असा मोर्चा काढला. या तरुणाला तात्काळ फाशी द्या, अशी मागणी ते करु लागले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. हा मोर्चा ओशिवरा पोलीस स्टेशनसमोर आल्यावर पोलिसांनी आंदोलकाची समजूत काढून त्यांना माघारी पाठवलं.
बुलढाण्याच्या मलकापुरातील सामान्य रुग्णालय आणि कोविड सेंटरचा वीज पुरवठा दीड तास खंडित झाल्याने अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरवर असलेला रुग्ण दगावला. जनरेटर अनेक महिन्यांपासून नादुरुस्त असल्याचं समोर आलं आहे.
पार्श्वभूमी
कोविड सेंटरचा वीजपुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटरवरील एका रुग्णाचा मृत्यू, मलकापुरातील धक्कादायक प्रकार
बुलढाण्यातील मलकापूर उपजिल्हा रुग्णालाय आणि कोविड सेंटरमधील वीजपुरवठा तब्बल दीड तास खंडित झाल्याने, रुग्णालयात भरती असलेल्या 25 रुग्णांचे प्राण टांगणीला लागले होते. त्यातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर वर असलेल्या एका कोविड रुग्णाला आपले प्राण गमवावे लागले. हा धक्कादायक प्रकार तब्बल दीड तास सुरु असल्याने कोविड सेंटरमधून रुग्ण बाहेर आले होते. रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णाला जीव गमवावा लागल्याचं म्हटलं जात आहे.
18 ते 44 वयोगटासाठी राज्यात आजपासून मोजक्या स्वरुपात लसीकरण
राज्यात आजपासून 18 ते 44 वयोगटासाठीही लसीकरण सुरु होणार आहे. मात्र लसींचा पुरवठा कमी असल्याने राज्यात मोजक्या स्वरुपात लसीकरण होणार आहे. या मोहिमेसाठी राज्याला तीन लाख डोस उपलब्ध झाले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात मोजक्या स्वरुपात आज हे लसीकरण सुरु होणार आहे. तीन लाखांपैकी मुंबई, ठाणे आणि पुण्याला प्रत्येकी 20 हजार डोस उपलब्ध होणार आहेत. तर राज्यातील विविध जिल्ह्यांना लोकसंख्येच्या प्रमाणानुसार 10 हजार, 7500 आणि 5000 डोस असे वाटप करण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या स्थिरावली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्राची जनता संयम पाळत आहे. रु्ग्णसंख्या ओसरली नाही पण रुग्णवाढ स्थिरावली आहे. जर निर्बंध लावले नसते तर महाराष्ट्रात साडेनऊ ते दहा लाख रुग्ण असते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. अजूनही काही दिवस निर्बंध पाळणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या वर्षीपासून महाराष्ट्रावर दुष्टचक्र आहे. गेले काही दिवस लॉकडाऊनसदृश्य बंधने टाकली आहे. सध्या गरज असली तरी तरी लॉकडाऊन करण्याची गरज वाटत नाही. कारण सगळे वागताना समजुतदारपणा दाखवत आहेत. त्यामुळे 9 ते 10 लाख अॅक्टिव्ह रुग्णांची शक्यता आपण 6 लाखांपर्यंत मर्यादेत ठेवली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -