Breaking News LIVE : 150 एन.एस.जी कमांडोंची लसीकरण करण्याच्या निमित्ताने बीकेसी लसीकरण केंद्राला भेट
आज सुमारे 150 एन.एस.जी कमांडोंनी लसीकरण करण्याच्या निमित्ताने बीकेसी लसीकरण केंद्राला भेट दिली. हा बूस्टर डोस एकदम सहजतेने दिला गेला आणि संपूर्ण सैन्याने बीकेसी लसीकरण टिमचे कौतुक केले. या क्रांतिकारक लसीकरण मोहिमेदरम्यान बीकेसी टीम देशाची सेवा करत असल्याचा आनंदच आहे : डॉ. राजेश डेरे, अधिष्ठाता, बीकेसी जम्बो कोविड रुग्णालय.
दिवसेंदिवस लातूर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्याभरात 144 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आज उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज लातूर जिल्ह्यात 1047 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 86 रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 146 अहवाल प्रलंबित आहेत. 1223 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 60 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26250 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 853 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 715 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 24682 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 41 आहे.
राज्यात आज 14 हजार 317 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, मागील 24 तासात 57 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, आज दिवसभरात 7 हजार 193 रुग्ण कोरोनामुक्त, आतापर्यंत 21 लाख 06 हजार 400 रुग्ण बरे होऊन घरी परतले, राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 92.94 टक्के, सध्या राज्यात 1 लाख 06 हजार 070 अॅक्टिव्ह रुग्ण
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व उद्याने बंद राहणार आहेत. शहरात काही दिवसांपूर्वी कोरोनाचे दिवसाला शंभरच्या आत रुग्ण आढळत होते. आता मात्र हाच आकडा सहाशे पार झालाय. म्हणून हा निर्णय महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी घेतलाय. 31 मार्चपर्यंत हा निर्णय लागू असेल, पुढील परिस्थिती पाहून उद्याने खुले करण्याचा निर्णय होईल.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने लागू केलेले निर्बंध पायदळी तुडवत जंगी विवाह सोहळा आयोजित केल्याप्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने कल्याण पूर्वेत आयोजकावर गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्याच्या आयोजनाबाबत कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने आधीच निर्बंध लागू केले आहेत. मात्र, त्या नियम आणि निर्बंधांना काही जणांकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचे आढळून आले आहे. कल्याण पूर्वेत काल संध्याकाळी अशाच प्रकारचा जंगी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्याठिकाणी 700च्या आसपास लोकांची उपस्थिती होती. पालिकेच्या पथकाला याबाबत माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेत या विवाह सोहळ्याच्या आयोजकांवर कलम 188, 269, 270, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 तसेच कोविड-19 उपाययोजना नियम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
भिवंडी शहरात कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता, पालिका प्रशासनाने कोरोनाचे नियम धुडकवणाऱ्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील 20 दिवसात पालिकेने आठ लाखांच्या दंडाची वसुली केली आहे. या कारवाईत 150 दुकानदार, 2 मंगल कार्यालये, तर 1500 नागरिकांकडून एकूण आठ लाखांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना मनपाने मास्क न लावणाऱ्यावरील कार्यवाही कडक केली आहे . दुकानदार, हॉटेल तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येत आहे. मुंबई, ठाणे कल्याण शहरात रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे भिवंडीत कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि याच पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येतेय. या कारवाई दरम्यान भिवंडीकरांना अद्यापही याचं गांभीर्य नसल्याचं दिसून आले.
धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे, बुधवारी एकाच दिवशी तब्बल 393 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रविवारपासून बुधवारपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याची मागणी व्यापारी महासंघाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. या प्रस्तावावर जिल्हा प्रशासन सकारात्मक असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. याबाबतचे आदेश लवकरच जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जनता कर्फ्यू लागू झाल्यास नागरिकांनी स्वयंशिस्तीने तो पाळावा असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
पुणे : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा 14 मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे पुण्यात परीक्षार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. त्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. पुण्यातील नवी पेठे येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
कोकण आरे तत्कालीन धारावी पोलीस स्टेशनचे निरीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्त रमेश नांगरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
MPSC ची राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आयोगाचा निर्णय, 14 मार्च रोजी होणारी परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनाची लस! मुख्यमंत्र्यांनी जे जे रुग्णालयात कोरोना लस घेतली आहे. मुख्यमंत्र्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
नागपुरात लॉकडाऊनची घोषणा, नागपूर शहरमध्ये 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर, पालकमंत्री नितीन राऊत यांची घोषणा
काँग्रेस नगरसेवक महेश भर्रे च्या घरातून 100 पेटी दारू जप्त करण्यात आली आहे. ब्रम्हपुरी शहरातील पेठ वार्ड परिसरात असलेल्या घरातून काल रात्री उशिरा जप्त करण्यात आला दारूसाठा, मुंबई येथून चंद्रपुरात आलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष भरारी पथकाने कारवाई केली. काँग्रेसचा हा नगरसेवक गेल्या अनेक महिन्यांपासून दारू तस्करीत सामील असल्याची चर्चा पण राजकीय दबावामुळे कारवाई होत नव्हती, पण उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकामुळे कारवाई झाली. महेश भर्रे आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल मात्र हा नगरसेवक कारवाई च्या वेळी घरी उपस्थित नसल्यामुळे त्याला सध्या अटक करण्यात आलेली नाही.
रिव्हॉल्वरचा धाक दाखवून देशी दारूच्या दुकानातून जबरदस्तीने 57 हजार रुपयांची रोख रक्कम काढून नेली आहे. सातारा अरण्येश्वर कॉर्नर जवळ व्ही आर गुप्ता देशी दारूचे दुकान आहे. बुधवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास दुकानात असताना अचानकपणे आलेल्या सहा व्यक्तींनी त्यांना पालघन व रिवाल्वर सारख्या हत्यारांचा धाक दाखवत दुकानात प्रवेश केला. त्यानंतर कॅश काउंटर मधील 57 हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली .या CCTV व्हिडिओत विरोध करणाऱ्या व्यक्तीला मारहाण करतानाही चोर दिसून आले आहेत. या प्रकरणी सहा अज्ञात व्यक्तींविरोधात सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. परंतु अशा पद्धतीने धारदार शस्त्र घेऊन पुण्यामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न वारंवार समोर येतोय.
- अन्वय नाईक कुटुंबाची पत्रकार परिषद
- नाईक कुटुंबियांकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
- फक्त श्रीमंत व्यक्तींना न्याय मिळणार का? अन्वय नाईक यांच्या कुटुबांचा सवाल
- विरोधी पक्षाकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे
- अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबलं गेलं हे अख्ख्या जगाला माहिती आहे
- अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण बाजूला, जमीन व्यवहारावर विरोधकांची चर्चा
- आरोप करणाऱ्या मंत्र्यांनी त्यांचे सातबारे दाखवावेत : नाईक
नांदेड: धर्माबाद तालुक्यातील नायगाव धरण येथील दारू दुकान अखेर बंद होणार आहे. कारण नायगाव येथे महिलांनी घेतलेल्या विशेष ग्रामसभेत बाटली आडवी करून, दारू बंदीचा ठराव मंजूर झालाय. या गावात असणाऱ्या दारू दुकानामुळे गावातील पुरुष मंडळी ही व्यसनाधीन व मद्यपी झाले होते. एवढेच नाही तर तिसरी चौथीच्या वर्गात शिकणारी शाळकरी मुलेही दहा-दहा रुपये जमवून दारू पिऊन धिंगाणा घालत होती. त्यासाठी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक वेळा धरणे व आंदोलने केली. घटनांची दखल घेत ABP माझाने हा मुद्दा लावून धरून पाठपुरावा केला. त्याची दखल अखेर नांदेड जिल्हा प्रशासनाला घ्यावी लागली व त्यानुसार नायगाव ग्रामपंचायत येथे काल विशेष ग्रामसभा बोलवून दारू बाटल आडवी करून दारू बंदीचा ठराव मंजूर करण्यात आलाय.
जिल्ह्यात गेल्या 11 दिवसात कोरोनाचे नवीन 4754 रुग्ण वाढले , तर जिल्ह्यात 19 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, प्रशासनाने लॉकडऊन लावले, संचारबंदी सुरु केलीय पण जिल्ह्यात कुठेही लॉकडाऊनचाचा सकारात्मक परिणाम दिसत नाहीय
अहमदनगर- द्राक्षाने भरलेला टेम्पो बस स्थानकात घुसला, या अपघातात एक तरुण जागीच ठार, पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील घटना, श्रीगोंदा येथून द्राक्षे घेऊन जाणार टेम्पो बुधवारी सायंकाळी 7 च्या सुमारास अचानक बस स्थानकात घुसला, टेम्पो चालक पोलिसांच्या ताब्यात.
जगप्रसिद्ध वेरूळच्या लेणीतील बुद्ध मूर्तीवर किरणोत्सव, वेरूळ लेणीतील दहा नंबरच्या बुद्ध मूर्तीवर किरणोत्सव
अंबरनाथ एमआयडीसीत बिस्कीट कंपनीला भीषण आग, आरके 1 नावाच्या बिस्कीट कंपनीला लागली आग, सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान आग लागल्याची माहिती, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंबरनाथ पालिकेच्या 2 आणि एमआयडीसीच्या 2 अशा चार फायरब्रिगेड घटनास्थळी
पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ सभापतींच्या पतीचा प्रताप समोर आलाय. भाड्याच्या घरात जुगार अड्डा चालवत असल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल केलाय. भाजपच्या विद्यमान नगरसेविका मनीषा पवार या शिक्षण मंडळ सभापती आहेत. त्यांचे पती प्रमोद पवार हे भाड्याने घर घेऊन जुगार अड्डा चालवीत असे. त्यावर वाकड पोलिसांनी छापा टाकून याचे बिंग फोडले. याप्रकरणी प्रमोद पवारसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जुगार खेळतानाच कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं ही गुन्ह्यात नमूद आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या रॉयल स्टोन बंगल्याच्या विशेष कार्यकरी अधिकारी दालनात एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न, अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला जाळून घेणार, तोच वेळीच पोलिसांनी अडवलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला, मंगळवारी दुपारी घडली घटना, पांडुरंग वाघ या व्यक्तीला सीआरपीसी ४१(१) अंतर्गत गुन्हा नोंदवत अटक करून त्याची जामिनावर मुक्तता, शासनमिश्रीत वाळू उत्खनन व वाहतूकीचा परवाना मिळवला होता. त्यासाठी त्यांनी शासनास ८ लाख ७२ हजार भरले होते, मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे वाळू उपसा झाला नाही, त्यामुळे पैसे परत मिळावे म्हणून वाघ आले होते.
पार्श्वभूमी
मनसुख हिरण यांच्या कुटुंबियांची एटीएसकडून चौकशी; बँक व्यवहार देखील तपासणार
प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर आज एटीएसने ठाण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. मुख्य म्हणजे मनसुख हिरण यांच्या बँक अकाउंट्सचे डिटेल्स त्यांनी मिळवले. आणि थेट कुटुंबियांना चौकशीला बोलवले. त्यामुळे एटीएस लवकरच तपासाची दिशा ठरविण्यात यशस्वी होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. एटीएसकडे तपास गेल्यानंतर आता चार दिवस उलटले आहेत. मनसुख हिरण यांच्या केसचा कागदी अभ्यास केल्यानंतर आता एटीएसची टीम फिल्डवर जाऊन तपास करत आहे. त्यातूनच आज एटीएसच्या टीमने ठाण्यातील अनेक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेटी दिल्या. यातून त्यांनी महत्वाची कागदपत्रे आणि महत्वाची माहिती संकलित केली.
रेल्वेत नोकरीच्या नावाखाली तरुणांना लाखोंचा गंडा, IRCTCच्या कर्मचाऱ्याला अटक, अंबरनाथमधील प्रकार
रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार अंबरनाथ पोलिसांनी उघड केला आहे. याप्रकरणी आयआरसीटीसीच्या एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कैलास राजपाल सिंग अस या भामट्याचं नाव आहे . बदलापूरला राहणारा कुमार चव्हाण हा नोकरीच्या शोधात असताना त्याला कैलास राजपाल सिंग या भामट्याने रेल्वेत नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं. कैलास आयआरसीटीसीच्या चर्चगेट स्टेशनवरील कँटीनमध्ये काम करत होता. खोटी परीक्षा, खोटी मुलाखत घेऊन पास होण्यासाठी 5 लाख रुपये त्याने कुमार चव्हाण याच्याकडून उकळले.
PET EXAM : मुंबई विद्यापीठाच्या पेट प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, याच महिन्यात होणार परीक्षा
मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार 25 मार्च रोजी एम. फील. तर 26 आणि 27 मार्च 2021 रोजी पीएचडी प्रवेश परीक्षा होणार आहे. एकूण 79 विषयांसाठी ही परीक्षा ॲानलाईन पद्धतीने होणार असून याबाबतचे सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. पेट परीक्षेच्या नियोजनाचा भाग म्हणून दिनांक 12 ते 17 मार्च दरम्यान विद्यार्थ्यांना मॉक ( सराव) परीक्षा देता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना लघुसंदेश आणि ईमेलवर माहिती पाठविण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॅा. विनोद पाटील यांनी सांगितले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -