Breaking News LIVE : 'एफआरपी'ची मोडतोड केल्यास देशभर शेतकऱ्यांचा उद्रेक होईल - राजू शेट्टी

Breaking News LIVE Updates, 24 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Apr 2021 07:07 AM
पिंपरी चिंचवड शहरात सूचना फलक कोसळला

पिंपरी चिंचवड शहरात सायंकाळी सूचना फलक कोसळला. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हे सूचना फलक होता. या फलकाखाली वाहनं आली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. आता हा मार्ग बंद करण्यात आला असून वाहतूक वळविण्यात आलेली आहे. हे फलक बाजूला घेतल्यावर वाहतूक पूर्ववत होईल.

'एफआरपी'ची मोडतोड केल्यास देशभर शेतकऱ्यांचा उद्रेक होईल -राजू शेट्टी

केंद्र सरकारने 'एफआरपी'ची मोडतोड करून तुकड्या देण्याचा घाट घातला


'एफआरपी'ची मोडतोड केल्यास देशभर शेतकऱ्यांचा उद्रेक होईल 


महाविकास आघाडीने केंद्राचा निर्णय लागू केल्यास पत्त्याप्रमाणे राज्य सरकार भुईसपाट होईल


माजी खासदार राजू शेट्टी यांचा महाविकासआघाडीला इशारा

राज्यात आज 67160 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ

राज्यात आज 67160 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 63818 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 3468610 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 694480 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.02% झाले आहे.

रिव्हॉल्व्हर साफ करताना गोळी सुटून चांदी व्यापाऱ्याचा मुलगा ठार

रिव्हॉल्व्हर साफ करताना गोळी सुटून चांदी व्यापाऱ्याचा मुलगा ठार, कोल्हापूरच्या हुपरीतील आज दुपारी घडला धक्कादायक प्रकार, सागर सुनील गाट असं मृत तरुणाचं नाव, घटनास्थळी पोलिसांची धाव, तपास सुरू,


सुनील गाट यांनी स्वसंरक्षणासाठी घेतला होती रिव्हॉल्व्हर

महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या हेल्पलाईन योद्ध्यांसाठी मेडिक्लेम इन्शुरन्स !
 

 

महाराष्ट्र  प्रदेश युवक काँग्रेसने सुरू केलेल्या कोरोना हेल्पलाईनमध्ये जे पदाधिकारी व कार्यकर्ते फ्रंटलाइन वॉरियर्स आहेत,  त्या सर्वांना  रु.1 लाख पर्यंतचा मेडिक्लेम  इन्शुरन्स पुरवण्याचा निर्णय आज अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जाहीर केला.

सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, नियंत्रण कक्ष स्थापन करून राज्यभरात जिल्हानिहाय हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे .रुग्णांना बेड मिळवून देणे, औषध उपलब्ध करणे, आयसीयू, व्हेंटिलेटरचे बेड मिळवून देणे अशी अनेक कामांमध्ये राज्यातील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत होत आहे.

 

" महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या  कोरोना हेल्पलाईनमध्ये काम करणारे सर्वच  पदाधिकारी व कार्यकर्ते हे माझ्यासाठी  फ्रंटलाईन योद्धे आहेत. ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना व्हायरस ग्रस्त रूग्णांना व त्यांच्या नातलगांना मदत करत आहेत.सध्याच्या दुसऱ्या लाटेत मध्ये काम करताना कोरोनाची लागण झाली आहे.त्यामुळे युवक काँग्रेसच्या फ्रंटलाईन योद्ध्यांना आम्ही रुपये एक लाख पर्यँत चा मेडिक्लेम विमा देणार आहोत"।अशी माहिती अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

 

 

 
उत्तर भारतीय मजुरांच्या गावाकडे परतण्यासाठी रांगा अजुनही सुरुच

पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर उत्तर भारतीय मजुरांच्या गावाकडे परतण्यासाठी रांगा अजुनही सुरुच आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक योजनांच्या घोषणा केल्या जात असल्या तरी त्यापैकी मजुरांपर्यंत काहीच पोहोचत नसल्याचं आणि त्यामुळे गावाकडे जाण्यावाचून पर्याय नसल्याचं या मजुरांचं म्हणणं. 

पनवेल महानगरपालिका उभारणार 800 खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटर

पनवेलमध्ये जम्बो कोविड केअर उभारण्याच्या हालचालींना वेग प्राप्त झाला आहे.  रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी कळंबोली येथील भारतीय कपास निगमचे गोदाम अधिग्रहण करण्यास मंजुरी दिल्यानंतर महसूल विभागाने हे गोदाम ताब्यात घेतले आहे. या ठिकाणाची रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री अदिती तटकरे, पनवेल आयुक्त यांनी पाहणी केली . पनवेल परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जम्बो कोविड केअर सेंटर उभारले जाणार आहे. ८०० बेडचे रूग्णालय उभारण्यात येणार असून ॲाक्सिजन , व्हेंटीलेटरची सोय केली जाणार आहे. 

मालेगाव शहरातील महात्मा फुले भाजी मंडईतील भाजी विक्रेत्यांचे ठिय्या आंदोलन  

शासनाने दिलेली सकाळी 7 ते 11 ही वेळ मान्य नसल्याचं सांगत मालेगाव शहरातील महात्मा फुले भाजी मंडईतील भाजी विक्रेत्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय. शासनाने वेळ वाढवून द्यावी यासाठी हे ठिय्या आंदोलन सुरू असल्याचं त्यानी सांगितलं. केवळ भाजी विक्रते यांनाच वेळेचे बंधन का असा सवाल करत अन्य दुकाने सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. 

मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं घर आणि मालमत्तेवर सीबीआयने छापा टाकल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यात वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक सुरु आहे.

नाशिक, विरार येथील हॉस्पिटल दुर्घटना नंतर कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत ऑडीटर, भरारी पथकं नियुक्त

मागील काही दिवसात विविध ठिकाणी घडलेल्या कोरोना रुग्णालयातील दुर्घटनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने पालिकेच्या आणि खाजगी रुग्णालयाच्या फायर, ऑक्सिजन, वीज,आणि स्ट्रक्चरल ऑडिटच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर साठा आणि हाताळणी याची पाहणी करण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे महापालिकेच्या 10 रुग्णालयाचे ऑडिट पालिकेच्या संबंधित विभागाकडून  तसेच ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या संबंधित ठेकेदारांच्या यंत्रणेकडून केले जाणार आहे. 

बीडच्या शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनअभावी दोन रुग्णांचा मृत्यू झालाचा नातेवाईकांचा आरोप

बीडच्या शासकीय रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्ये ऑक्सिजनअभावी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. परंतु रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांचे आरोप फेटाळले आहेत. 

ऑक्सिजन अभावी दिल्लीत 20 तर अमृतसरमध्ये 5 रुग्णांचा मृत्यू

देशातील कोरोनाच्या परिस्थितीने गंभीर रूप धारण केलं असून ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूत वाढ होताना दिसत आहे. दिल्लीच्या 'जयपूर गोल्डन' रुग्णालयात ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अमृतसरमध्ये 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

ऑक्सिजन एक्स्प्रेस नाशिक ला दाखल

ऑक्सिजन एक्स्प्रेस नाशिकला दाखल, मोठा दिलासा. राज्यात एकिकडे कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असतानाच ही बातमी दिलासादायक ठरत आहे. 

ईडी आणि सीबीआयचा वापर राजकीय हेतूसाठी, राष्ट्रवादीला बदनाम करण्याचं काम सुरू: मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप

केंद्रातील भाजपने ईडी आणि सीबीआयचा वापक केवळ राजकीय हेतूने करायला सुरू केलं आहे. सध्या आरोपी असलेल्या लोकांच्या केवळ एका पत्रावरून सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरी छापेमारी केली असून हा राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. 

सीबीआय आपलं काम करेल, कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही : खासदार संजय राऊत

न्यायालयाने आपलं काम केलं आहे, आता सीबीआयसुध्दा आपलं काम करेल. कायद्यापेक्षा मोठं कोणीही नाही असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. माजी गृहमंत्री यांच्या घरी आणि मालमत्तेवर सीबीआयने आज छापेमारी सुरू केली. त्यावर संजय राऊत बोलत होते.

अनिल देशमुख यांचं घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयचा छापा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयचा छापा 

पालघरमध्ये कोरोनामुळं मुलाच्या मृत्यू नंतर आईचा मृत्यू

विरार मधील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी झालेल्या दुर्घटनेमध्ये पालघर तालुक्यातील अल्ल्याळी मधील 37 वर्षीय निलेश भोईर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर आज पहाटे निलेश भोईर यांची आई अनिता एकनाथ भोईर यांचा पालघरच्या फिलिया हॉस्पिटलमध्ये कोरोनाने उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पार्श्वभूमी

मोठा दिलासा, राज्यात 74, 045 रुग्ण बरे होऊन घरी, 66,836 नवीन रुग्णांचे निदान तर 773 मृत्यू
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे.  आज  66  हजार 836 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.  दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. राज्यात आज 773 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे करोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याचं समोर येऊ लागलं आहे.


राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज  66 हजार 836 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 74 हजार 045 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 34 लाख 04 हजार 792 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.81 टक्के  झाले आहे. राज्यात आज 773 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.52 टक्के एवढा आहे.


एकही लस उपलब्ध नाही, ठाण्यातील लसीकरण ठप्प
एकीकडे बेड मिळेना, ऑक्सिजन मिळेना आणि इंजेक्शन मिळेना तरीही ठाणेकरांचे लसीकरण मात्र सुरु होते. तर शुक्रवारी (23 एप्रिल) ठाण्यातील लसीकरण केंद्रे देखील  दुपारी 12 वाजताच साठा संपल्याने बंद करण्यात आली. ठाण्यात शुक्रवारी लसींचा साठा शून्य होता. त्यामुळे लसीकरणासाठी मोठी गर्दी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालय आणि पालिकेच्या पाच लसीकरण केंद्रावर दिसली. तसेच लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट होताना दिसली. 


मुंबईत रस्त्यावर विनामास्क क्रिकेट खेळणाऱ्या 20 वर्षीय मुलाला कोर्टानं जामीन नाकारला
राज्यातील कोरोनाची भयंकर परिस्थिती आणि विशेषत: मुंबईतील तीव्रता लक्षात घेता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने मुंबईसह राज्यभरात कलम 144 लागू (संचारबंदी) केलं आहे. अशा गंभीर परिस्थितीत आरोपी इतर मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. तेही मास्क न घालता हे आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचं उल्लंघनच आहे. तसेच आरोपीनं मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता कायदाही हातात घेतला आहे. तो जरी 20 वर्षांचा असल्यानं त्याला सद्यपरिस्थितीची जाणीव असणं गरजेचं आहे. त्यासोबतच घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्याचं भान असणंही आवश्यक आहे. त्यामुळे अर्जदाराला जामीन दिल्यास सर्वसामान्यांसमोर चुकीचा संदेश जाऊ शकतो. असं स्पष्ट करत न्यायालयानं युवकाचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्याला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.