Breaking News LIVE : कोल्हापुरातील दत्त साखर कारखान्यातील तीन कामगारांचा मृत्यू
Breaking News LIVE Updates, 25 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये
आज 71,736 रुग्ण बरे होऊन घरी, आज राज्यात 48,700 नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज 524 करोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूची नोंद
कोल्हापुरातील दत्त साखर कारखान्यातील तीन कामगारांचा मृत्यू, पाणी शुद्धीकरण टँकमध्ये पडून तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती, टँकमध्ये पडलेल्या एकाला वाचवण्यासाठी गेलेले दोन कामगारांचा देखील मृत्यू
सोलापूर शहरात मुसळधार पावसाला सुरुवात, शहरातील विविध भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, विजांच्या कडकडाटसह पावसाची हजेरी
रिलायन्स फाऊंडेशनकडून मुंबईत 875 बेडस् नवे उपलब्ध, एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये 600 क्षमता आहे.
वरळतील एनएससीआय मध्ये १०० ,
सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये ४५ आयसीयुसह १२५ बेडस,
ट्रायडंट, बिकेसी येथे १०० बेडस् ची नव्यानं उपलब्धता
कोरोना काळात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने एप्रिल आणि मे महिन्यात एक दिवस म्हणजे दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले जाणार. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने अर्थमंत्री अजित पवार यांना लिहिले पत्र, दीड लाख अधिकारी क्लास एक आणि क्लास दोन मिळून अधिकारी दोन दिवसांचा पगार देणार, कमीत कमी 50 कोटी निधी मुख्यमंत्री सहायता निधीला मिळू शकेलं
आज ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा ठाकरे सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रोज राज्यात रुग्णालयात कधी आगीमुळे तर कधी ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होतोय. मात्र आरोग्य मंत्री फक्त भाषण करत फिरतात, इतक्या घटना घडत असताना आरोग्य मंत्र्यांची हकलापट्टी का केली जात नाही? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच तत्काळ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढत आहे. दुसरी लाट थोपवण्यासाठी सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आज मुंबई उपनगरातल्या कांजुरमार्ग येथील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीच्या जागेत राज्य सरकार सिडको, महापालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने महाजम्बो कोविड सेंटर निर्मितीचा शुभारंभ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते झाला. 2500 बेड्स आणि 300 आयसीयू बेड्स या सेंटरमध्ये असणार आहेत. 15 जूनपर्यंत हे कोविड सेंटर उभे राहणार आहे.
मुंबईत हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी आजही बेड्ससाठी नातेवाईकांची कसरत सुरुच आहे. भीनमाल जैन संघातर्फे मुंबईच्या प्रसिद्ध पी.जी. हिंदू जिमखान्यात 100 बेड्सचं कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आलं आहे. तिसऱ्या मजल्यावरील बॅडमिंटन कोर्टच्या प्रशस्त हॉलमध्ये हे सेंटर उभारण्यात आलं आहे. तसेच संध्याकाळच्यावेळी इथून मरिन ड्राईव्हचं होणारं विहंगम दृश्य पाहूनच रुग्णांना मोठं मानसिक समाधान लाभेल यात शंकाच नाही. मुख्य म्हणजे इथे 35 बेड्स हे आयसीयू सुविधेसह उपलब्ध आहेत. मरिन लाईन्स स्टेशनच्या बाहेरच असलेल्या या कोविड सेंटरपर्यंत पोहोचणंही रुग्णांसाठी अगदी सोप्प आहे. एरव्ही उच्चभ्रू लोकांचे आलिशान लग्न सोहळे आयोजित केले जातात, मात्र सध्याच्या कोरोना संकटकाळात इथे कोरोनाग्रस्तांसाठी विनामूल्य कोविड केअर सेंटर उभारण्यात आलं आहे.
सोलापुरातील बार्शीमध्ये असलेल्या नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर रुग्णालयात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत. रुग्णांची तब्येत आधीपासून खालावली होती, त्यांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झालेला नाही, अशी माहिती हेमंत निकम यांनी एबीपी माझाला फोनवरुन दिली. दुसरीकडे यासंबंधी माहिती घेण्यासाठी गेलेल्या तहसीलदार सुनील शेरखाने यांना मात्र कोणतीही माहिती देण्यात आली नाही. रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून मृतांचा अहवाल मागवणार असल्याचं तहसीलदार सुनील शेरखाने यांनी सांगितलं.
शहरातील विविध पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून फक्त काजवा पूल सुरू ठेवण्यात आला आहे, यामुळे या पुलावर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
गोव्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करताना ई-पास सक्तीचा केला आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करताना बांदा-सटमटवाडी येथील तपासणी नाक्यावर थांबवण्यात येत आहे. गोव्यातून सिंधुदुर्गात प्रवेश मिळवण्यासाठी अनेक प्रवासी ऑनलाईन ई-पास काढण्यासाठी धावपळ करत आहेत. आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी शासनाने ई-पास सक्तीचा केला आहे. सीमेवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर याची कडक अंमलबजावणी सुरु आहे. ई-पास नसलेल्या वाहनधारकांना सीमेवर थांबवण्यात येत आहे. पास असलेल्या वाहनचालकाना प्रवेश देण्यात येत आहे. यामधून अत्यावश्यक सेवेची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सवलत देण्यात आली आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे इतर रस्ते देखील बंद करण्यात आले असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबईतील सर्व लसीकरणे केंद्रे आज सुरु राहणार आहेत. मुंबई महापालिकेला दीड लाख कोविशील्ड लसींचा पुरवठा झाल्याची माहिती मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. दरम्यान गोरेगावच्या नेस्को केंद्राबाहेर लसीकरणासाठी नागरिकांच्या पहाटे चार वाजल्यापासूनच रांगा पाहायला मिळत आहेत.
राज्यात सरसकट लोकांना लस मोफत द्यायची का याबाबत मंत्र्यांमध्ये मतभिन्नता आहे. गरीब जनतेला लस मोफत देण्यात यावी याबाबत मंत्र्यांमध्ये एकमत आहे. पण ज्या वर्गाला पैसे देऊन लस घेता येईल त्यांनी ती विकत घ्यावी अशीही भूमिका काही मंत्र्यांची आहे. राज्यात वय वर्ष 18 ते 45 मध्ये पाच कोटी नागरिक येतात. याचा अर्थ या नागरिकांना 10 कोटी लसींचे डोस लागणार आहेत. सरसकट सगळ्यांना लस मोफत द्यायची झाली तर साधारण राज्य सरकारवर चार हजार कोटींचा भार येऊ शकतो. त्यामुळे सरसकट लस सगळ्यांना मोफत देण्याऐवजी गरिबांनाच लस मोफत द्यावी, ज्यांना परवडत त्यांनी पैसे देऊन घ्यावी असेही काही मंत्र्यांचे मत आहे.
कोरोना काळात नंदुरबार जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून पोलीस प्रशासनाच्या वतीने अडीच कोटीचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात 6 हजार 693 नागरिकांवर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्या आणि लॉकडाऊन चे नियम तोडणाऱ्या 1 लाख नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली असून त्यातून ही दंड वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिली आहे. नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा नाहीतर कारवाई आधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील अनेक भागात रविवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. दुष्काळी जत तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. जत शहरात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर मिरज तालुक्यातील तुंग येथे एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली आणि नारळाच्या झाडाने पेट घेतला. सायंकाळनंतर जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं. त्यानंतर जत तालुक्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. तर सांगली शहरातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला.
वर्ध्यात आयसोलेशन कक्षात पोहोचण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात हा प्रकार घडला. रुग्णाला व्हीलचेअर उपलब्ध न झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन रुमच्या दाराजवळच महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान रुग्णालयात व्हीलचेअर उपलब्ध असतात. या महिलेचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टने झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे आहे.
नागपूर : मकोकाच्या आरोपात मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेला कुख्यात गुंड रोशन शेख याच्यावर कारागृहातच हल्ला करण्यात आला आहे. कारागृहातील एका बंदिस्त आरोपीने धारधार शस्त्राने हा ह्ल्ला केलाय. काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. सध्या जखमी आरोपीवर रुग्णलायत उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.
पार्श्वभूमी
तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील रासायनिक कारखान्यांनी सोडलेल्या विषारी वायूमुळे नागरिकांना त्रास, भीतीचे वातावरण
बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातून बेकायदेशीर पणे मोठ्या प्रमाणात विषारी वायू सोडल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या कोलवडे गावात या वायूचा प्रंचड त्रास नागरिकांना होऊ लागला. यामुळे काही नागरिकांना चक्कर येण्याच्या घटना देखील घडल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांनी वायू प्रदूषण पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरु केल्याचं दिसून आलं आहे. टाळेबंदी असल्याचा फायदा घेत प्रदूषणकारी उद्योजक बेकायदेशीरपणे विषारी वायू हवेत सोडत असल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री 10 च्या सुमारास औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या कोलवडे गावात मोठ्या प्रमाणात विषारी वायू मिश्रित धूर संपूर्ण गावात पसरला. काही वेळात नागरिकांना डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे आणि चक्कर येण्याच्या घटना घडू लागल्याची माहिती कोलवडे येथील सामाजिक कार्यकर्ते मनिष संखे यांनी दिली. यातच हवे पेक्षा जड असलेल्या या वायु मिश्रित धुरामुळे श्वास घेण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आलं. गावकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्व अधिकाऱ्यांचे फोन बंद असल्याचं आढळून आलं. एवढी मोठी घटना घडूनही एकही अधिकारी याठिकाणी रात्रीच्या वेळी उपलब्ध नसल्याने प्रदूषणकारी कारखान्यांचे फावत चालले आहे.
राज्यात काल दिवसभरात 66 हजार 191 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर 61 हजार 450 रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. राज्यात काल दिवसभारत 66 हजार 191 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 61 हजार 450 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 35 लाख 30 हजार 60 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.19 टक्के झाले आहे. राज्यात एकूण 6 लाख 98 हजार 354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात काल एकूण 832 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.51 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 64 हजार 760 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल नोंद झालेल्या 832 मृत्यूंपैकी 360 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 244 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 228 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.
एकाच वेळी तीस जणांवर अंत्यसंस्कार! बीडच्या अंबाजोगाईतील भीषण परिस्थिती
बीड : कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची बातमी दाखवून आम्ही घाबरवत नाहीत तर कोरोनाचे निर्बंध न पाळणाऱ्यांना भानावर आणण्यासाठी ही बातमी... कोरोनाचे निर्बंध पाळा हे अनेक वेळा सांगून सुद्धा लोक ऐकत नाहीत. शनिवार आणि रविवार म्हणजे काल आणि आज अंबाजोगाईमध्ये एकूण तीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.यातील 28 जणांना अग्निडाग तर दोन जणांचा दफनविधी करण्यात आला. अंबाजोगाई नगरपालिकेकडून हे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. रोज कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतील हे छप्पर आता सुद्धा कमी पडू लागले.
मागच्या दोन आठवड्यापासून बीड जिल्ह्यामध्ये एक हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. वाढणाऱ्या रुग्णांसोबत रूग्णांच्या मृत्यूचा आकडा सुद्धा वाढत आहे. काल आणि आज म्हणजे शनिवार व रविवार या दोनच दिवसात अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या 30 रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 28जणांना अग्निडाग तर दोन जणांचा दफनविधी करण्यात आला. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एकाच सरणावर आठ जणांना अग्निडाग दिला होता का पुन्हा दिसणारे हे दृश्य थरकाप उडवणारे आहे..
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -