Breaking News LIVE : रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण; वर्षा निवासस्थानीच होणार होम क्वारंटाईन
Breaking News LIVE Updates, 23 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
राज्यातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द त्यांनीच याबाबतची माहिती ट्विट करत दिली. 'माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी', असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं.
महाबळेश्वर परिसरात मुसळधार अवकाळी पाऊस. अवकाळी पाऊसामुळे स्ट्रॉबेरीचं पिक धोक्यात. शेतकरी चिंतेत
महाविकास आघाडीचे सरकार आलं तरी दीड वर्ष होत आले तरी माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोडवले नाहीत. त्यांच्याकडे बैठकीसाठी वेळ मागूनही ते भेटत नाहीत. त्यामुळे आपण शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी घोषित केले आहे. नरेंद्र पाटील यांनी लोकसभेची निवडणूक सातारा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून लढवली होती.
सांगली महापालिकेतील भाजपची सत्ता काढून घेत राष्ट्रवादीचा महापौर विराजमान करण्यामागे किंगमेकर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील प्रथमच सांगली महापालिकेत आलेत. यानिमित्ताने महापालिकेत जयंत पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. जयंत पाटील यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली आहे.
महापालिकेत पार पडत असलेल्या या आढावा बैठकीवर भाजपने बहिष्कार टाकला असून भाजपचा एकही नगरसेवक या बैठकीस उपस्थित नाही.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा या सततच्या मागणीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विरोधकांना टोला हाणलाय. दर महिन्याला दोन-तीनदा आमचा विरोधी पक्ष महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा मागणी करत असतो, त्यात नवीन काही नाही. महाराष्ट्रामध्ये काहीही झाले तरी विरोधक राष्ट्रपती राजवट लागू करायची मागणी करतात, ही आठवी - नववी मागणी आहे असं सांगत राज्याच्या मंत्री मंडळात कोणत्याही प्रकारच्या बदलाचा आवश्यकता नाही असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
सोलापूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी नवीन आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार शहरातील आठवडी बाजार आणि जनावरांचे बाजार बंद कऱण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 31 मार्च पर्यंत शहरातील आठवडी बाजार आणि जनावरांचे बाजार बंद ठेवण्यात यावेत असे आदेश पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिलेत. त्यानुसार आज शहरातील मुख्य आठवडी बाजार असलेले मंगळवार बाजार बंद कऱण्यात आले. सोमवारी रात्री उशिरा आदेश निघाल्याने अनेक व्यापाऱ्यांना या बाबत माहिती नव्हती. म्हणून बाजारात नेहमीप्रमाणे व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली होती. मात्र पोलिसांनी आवाहन करुन ही सर्व दुकाने बंद करण्यास सांगितले. तसेच भाजीपाला आणि नाशवंत पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांना आज दुपारी दोन पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
पुण्यातील पुण्यभुषण फौंडेशनकडून दिला जाणारा 32 वा पुण्यभुषण पुरस्कार उद्योजक आणि भारत फोर्ज कंपनीचे प्रमुख बाबा कल्याणी यांना जाहीर.
सोलापुरातील आठवडी बाजार आणि जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत. कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता शहरातील सर्व बाजार 31 मार्च पर्यंत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नागपुरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून सकाळी नऊच्या सुमारास काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. रात्रीही नागपूर शहरातील अनेक भागात हलका पाऊस झाला होता. हवामान विभागाने पुढील दोन दिवस तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी व प्रमुख शहर व गांवामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसनी लावण्यात आलेल्या बॅनरची चर्चा पहायला मिळत आहे."थँक्यू मोदी सरकार" च्या उपहासात्मक बॅनरची सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पेट्रोल शंभरीच्या आसपास, खड्ड्यात गेलेला शेअर बाजार, बेरोजगारी व आकाशाला भिडलेल्या महागाईचा उल्लेख बॅनरमध्ये केलेला आहे. इंधन महागले प्रवास करणार कसे ? अन्नधान्य महागले खाणार काय? गॅस महागले अन्न शिजवणार कसे ? जनता विचारतेय मोदाजी,उत्तर द्या असे प्रश्न बॅनरवर उपस्थित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिल्हाभर महत्त्वाच्या ठिकाणी "सब जगसे पड रही है मार थँक्यू मोदी सरकार"असे फलक लावून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला आहे.
नवनीत राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा. कारण तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे म्हणून मांडता आली आहे अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केली.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर अपघात, रसायनीनजीक ट्रेलरची टेम्पोला धडक, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर अपघात, चालक आरिफ शेखचा जागीच मृत्यू, जखमी ट्रेलर चालक संतोषकुमार गुप्ता याला एमजीएम रुग्णालयात दाखल.
वाशिम जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस बरसतोय. गेल्या 4 दिवसांपासून रोज रात्री पासून सकाळपर्यंत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस वाशिम जिल्ह्यात पडत आहे. त्यामुळे भाजीपाला, आंबा, फळबागांचे मोठं नुकसान झालंय.
पार्श्वभूमी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
राज्यात कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना गेल्याचा समज, सार्वजनिक ठिकाणी होणार गर्दी, नागरिकांचा बेजबाबदारपणा यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढची रणनीती आखली जाऊ शकते. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच म्हटलं होतं की कोरोनाचे रुग्ण वाढत असतील तर काही शहरांमध्ये लॉकडाऊन करावा लागेल. या आज मुद्द्यावर आरोग्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. राज्यात कडक निर्बंध लावायचे किंवा लॉकडाउनचा निर्णय याबाबत चर्चा होऊ शकते. लॉकडाऊन टाळायचे असेल तर कोरोनासंबंधीच्या नियामांचे पालन नागरिकांना करावे लागेल.
शहीद दिनाच्या निमित्ताने देशवासियांचे भगतसिंहांना नमन; जाणून घ्या का साजरा केला जातोय शहीद दिन
भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव म्हटल्यानंतर समस्त भारतीयांसमोर क्रांतीचा, देशप्रेमाचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या त्रयिचा एक चेहरा येतो. त्यांना आजच्याच दिवशी 1931 साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. या दिवसाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतोय. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक भारतीयांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं आहे. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव त्यातील अग्रणी. इंग्रजी सरकारच्या 'पब्लिक सेफ्टी बिल अॅन्ड ट्रेड डिस्ट्रिब्यूशन बिल' च्या विरोधात भगतसिंहांनी सेट्रंल असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडला होता. त्यावेळी त्यांनी स्वत: ला पोलिसांच्या हवाली केलं.
भारत-इंग्लंड संघांत आजपासून तीन वन डे सामन्यांची मालिका
विराट कोहलीच्या टीम इंडियानं पाहुण्या इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपाठोपाठ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिकाही जिंकण्याचा पराक्रम गाजवला. आता उभय संघांमधल्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला आजपासून पुण्यातल्या गहुंजेच्या एमसीए स्टेडियवर सुरुवात होत आहे. दुपारी दीड वाजता होणार सामन्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेतला पहिला सामना आज, तर उर्वरित दोन सामने 26 आणि 28 मार्च रोजी खेळवण्यात येतील. ही मालिका जिंकून इंग्लंडविरुद्ध विजयाची हॅटट्रिक साधण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -