Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ब्राह्मण समाजाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर ब्राम्हण संघटनेकडून छगन भुजबळ यांना कानाखाली मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छगन भुजबळांच्या कानाखाली मारणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस देणार, अशी घोषणा करण्यात आली आहे.
परशुराम सेवा संघाकडून धमकी
जो कुणी भुजबळांच्या कानाखाली मारेल त्याला एक लाख रूपयांचं बक्षीस दिलं जाईल, अशी घोषणा परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केली आहे. छगन भुजबळांनी केलेलं वक्तव्य हे हिंदू समाजात तेढ निर्माण करणारं आहे, असं ते म्हणाले. भुजबळांनी मागेही सरस्वतीवर वक्तव्य केलं होतं आणि नंतर माफी मागितली होती, असं ते म्हणाले. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी ही नावं का असत नाहीत? असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं होतं.
भुजबळ सातत्यानं गरळ ओकत आहेत - देशपांडे
छगन भुजबळ हे सातत्याने गरळ ओकत आहेत. ब्राम्हण समाजाविषयी नीचपणाची विधानं छगन भुजबळ करत असल्याचं परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे म्हणाले. सरस्वतीचा अपमान करणारं विधानही भुजबळांनी केलं आहे, तर छगन भुजबळांनी कोणाची पुजा करावी हा त्यांचा प्रश्न असल्याचं म्हणत विश्वजीत देशपांडेंनी छगन भुजबळांवर टीका केली आहे.
काय होतं भुजबळांचं विधान?
शनिवारी नाशिकमध्ये बोलताना भुजबळ म्हणाले होते की, ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी नावं नसतात. तसेच काही जणांना सरस्वती आवडते, तर कोणाला शारदा आवडते. आम्ही काय त्यांना पाहिले नाही. आमचं शिक्षण झालं ते महापुरुषांमुळे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांनीच आम्हाला शिक्षणाची दारं खुली करुन दिली, असं भजबळ म्हणाले होते.
वादग्रस्त वक्तव्यावर भुजबळांचा खुलासा
ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी ही नावं ठेवली जात नाहीत, तर संभाजी भिडेंचं नाव संभाजी कसं? याचं स्पष्टीकरण द्या, असं आव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं. मात्र भुजबळांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यावर आज अखेर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ब्राह्मण समाजाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही, केवळ मनोहर कुलकर्णींचं संभाजी भिडे कसं झालं? याचं स्पष्टीकरण द्या, असं भुजबळ म्हणाले.
सरस्वती देवीबाबत भुजबळांचं वादग्रस्त वक्तव्य
ज्यांना कधी बघितलंच नाही त्या सरस्वतीची आपण पूजा करतो. पण त्याच सरस्वतीने 5 हजार वर्षं आम्हाला का शिकू दिलं नाही? त्यामुळे खऱ्या अर्थानं शिक्षणाची देवता या सावित्रीबाई फुलेच आहेत, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलं होतं. नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा: