अकोला : अकोला जिल्ह्यातील गायगाव (Akola Gaigaon Video Viral) येथे एक संतापजनक प्रकार घडला आहे. प्रेयसीने बुरखा का घातला?, म्हणत एका टोळक्यानं तिच्या प्रियकराला बेदम मारहाण केली. गायगावच्या ऑईल डेपोसमोर शनिवारच्या दुपारी हा प्रकार घडला आहे. प्रियकराला मारू नका, म्हणत मुलीनं टोळक्याला वारंवार विनंती केली. मात्र, या टोळक्यानं रस्त्यावरच मुलीला घातलेला बुरखा उतरवायला लावला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. यानंतर याप्रकरणाची स्वत:हून जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी उरळ पोलिसांना कारवाईचे आदेश दिलेत. मारहाण करणाऱ्या दोन युवकांवर उरळ पोलीसांनी अटक करून गुन्हे दाखल केले आहेत. मारहाण करणाऱ्या आरोपींची नावं मात्र उरळ पोलिसांनी गुप्त ठेवली आहेत.  


काय आहे नेमके प्रकरण? : 


शनिवारी दुुपारी एक प्रेमीयुगल अकोल्यावरून गायगावच्या गणपती मंदिराकडे निघाले होते. हे जोडपं त्यांच्या दुचाकीने गायगावला निघाले होते. यात दुचाकीवरील प्रियकराने तोंडाला स्कार्फ बांधला होता. तर तरूणीने बुरखा घातलेला होता. यावेळी गायगाव येथील ऑईल डेपोसमोरून जात असतांना हे जोडपं एका टोळक्याच्या नजरेस पडलं. यावेळी या टोळक्यानं दादागिरी करीत त्यांची दुचाकी थांबवली. त्यांना कुठे जात आहात? नाव-गाव काय? अशी विचारणा सुरू केली. बुरख्यातील मुलीला तिचा चेहरा दाखविण्यासाठी ते टोळकं जबरदस्ती करू लागलं. याला 'त्या' मुलीच्या प्रियकराने विरोध केला असता या टोळक्यानं त्याला अमानुषपणे मारहाण सुरू केली. यावेळी ती तरूणी आपल्या मित्राला मारू नका म्हणून हात जोडून विनंती करीत होती. मात्र, बेभान झालेल्या या झुंडीनं मारहाण थांबवली नाही. त्यांना आवरू पाहणाऱ्यांनाही या टोळक्यानं जुमानलं नाही. आवरू पाहणाऱ्या नागरिकांनाही मारहाणीचा प्रयत्न या टोळक्याकडून करण्यात आला. 


... अन तरूणीला रस्त्यावरच गर्दीसमोर बुरखा उतरवायला लावला : 


या तरूणीने बुरखा का घातला?, म्हणून या टोळक्यानं तिच्या प्रियकराला मारहाण सुरू केली. ती मुलगी "आपली चूक झाली, माफ करा", असं म्हणत त्या टोळक्याला मित्राला मारू नका म्हणून रडत विणवण्या करीत होती. यावेळी या टोळक्यानं तरूणीला अश्लिल शिवीगाळही केली. या तरूणीने मारहाण करणाऱ्यांना अगदी गुडघ्यावर बसत हे थांबवण्याची विनंती केली. यानंतर या टोळक्यानं अगदी भररस्त्यावर सर्वांच्यासमोर त्या तरूणीला बुरखा अंगातून काढण्यास भाग पाडलं. एवढी गर्दी असतांनाही या टोळक्याची ही गुंदागर्दी बिनबोभाटपणे सुरू होती. 


पोलीस अधीक्षकांनी दिले पोलीस कारवाईचे आदेश : 


या घटनेचा समाज माध्यमांवर 'व्हायरल' झाला. या गंभीर प्रकाराची दखल अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्वत: घेतली. त्यांनी याप्रकरणी बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत. यानंतर उरळ पोलीसांनी तात्काळ चौकशीची सुत्रं फिरवित मारहाण करणाऱ्या टोळक्यातील दोन आरोपींना अटक करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. मात्र, एखाद्या टोळक्याची असा कायदा हातात घेण्याची होणारी हिंमत ही उरळ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.  


गायगाव परिसरातील गुंडगिरी मोडीत काढण्याचं अकोला पोलिसांसमोर आव्हान : 


बाळापूर तालुक्यातील गायगाव येथे इंडीयन ऑईलचा डेपो आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा डेपो आणि गायगावचा परिसर गुंडगिरी करणा-या टोळ्यांचं मोठं केंद्रं बनलं आहे. डेपो परिसरातील टँकर्समधून पेट्रोल-डिझेल चोरी करणा-या अनेक टोळ्या येथे कार्यरत आहेत. या टोळ्यांमध्ये अनेकदा वर्चस्वाची लढाई सुरू असते. अकोल्यातील अनेक गुन्हेगारी टोळ्या यात गुंतल्या आहेत. यातूनच येथे इंधन चोरीसोबतच येथून जाणा-या नागरिकांसोबत दादागिरी करणे, मारहाण करण्याचे प्रकार सर्रास घडतात. गायगाव हे बाळापूर तालूक्यातल्या उरळ पोलीस स्टेशनमध्ये येते. मात्र, उरळ पोलिसांचं वर्षानुवर्षे येथील या टोळ्यांच्या कारवायांकडे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष असतं. त्यातूनच अशा गंभीर घटना घडतात. अकोला जिल्हा पोलीस अधिक्षकांसह राज्यातील पोलीस दलाच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.  


राज्य महिला आयोग दखल घेणार का? 


गायगावमधील हा प्रकार जेव्हढा गंभीर तेवढाच धक्कादायक आहे. एक टोळकं दिवसाढवळ्या एका मुलीला अश्लिल शिवीगाळ करतं. तिला भर रस्त्यावर लोकांसमोर तिचे कपडे उतरावायला भाग पाडतं, हे सारंच संतापजनक आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य महिला आयोगानं घेणं गरजेचं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर महिलांच्या प्रश्नांवर नेहमीच आक्रमक राहतात. त्या अकोल्यातील या घटनेची दखल घेत दोषींवर कठोर कारवाईसाठी पाठपुरावा करतील अशी अपेक्षा आहे.