मुंबई : लग्नाचं अमिष दाखवून महिलेशी शारीरिक संबंध ठेऊन त्यानंतर शब्द फिरविणाऱ्या आरोपीला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. पत्रिका जुळत नाही हे लग्नाचं वचन मोडण्याचं कारण असूच शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टानं आरोपीची गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.
त्यानुसार, तक्रारदार महिलेला दिलेलं लग्नाचं वचन पाळण्याचा आरोपीचा सुरुवातीपासून कोणताही हेतू नव्हता असं प्रथमदर्शनी पुराव्यातून सिद्ध होत आहे. तसेच आपण लग्नाला नकार दिल्यास महिला पोलिसांकडे तक्रार दाखल करेल त्यामुळे तक्रार टाळण्यासाठी आरोपीनं समुपदेशकासमोर लग्नाची तयारी दर्शवली होती. आरोपीचा हेतू प्रामाणिक आणि खरा असता तर त्याने समुपदेशकांना पत्र लिहून लग्न करणार नसल्याचं कळवलं नसतं. त्यामुळे पत्रिका जुळत नसल्यानं लग्नाचं वचन मोडलं हा युक्तिवाद ग्राह्य धरता येणार नाही, असं स्पष्ट करत हायकोर्टानं सत्र न्यायालयानं दिलेले आदेश कायम ठेवत याचिकाकर्त्याला कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्याची याचिका फेटाळून लावली. या याचिकेवर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर सुनावणी पार पडली.
काय आहे प्रकरण?
बदलापूर इथं राहणाऱ्या अविशेक मित्राचे (33) चे बोरीवलीतील एका महिलेशी प्रेमसंबंध होते. ते दोघेही एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साल 2012 मध्ये एकत्र काम करत होते. दरम्यान, अविशेकनं महिलेला लग्नाचं खोटं आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुढे ती गर्भवती राहिल्यानंतर अविशेकनं तिला पुन्हा लग्नाचं वचन देऊन तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं. त्यांनतर मात्र अविशेकनं तिला टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. अखेरीस 28 डिसेंबर 2012 रोजी पीडित महिलेने बोरीवली पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक आणि बलात्कार करून शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. तेव्हा, दोघांनाही एकत्र बोलवून बोरीवली पोलिसांनी 4 जानेवारी 2013 रोजी समुपदेशनासाठी पाठवलं होतं. तेव्हा आरोपीनं घरच्यांसमोर लग्नाची तयारी दर्शवली त्यामुळे तक्रारदार महिलेनं तक्रार मागे घेतली. मात्र, 18 जानेवारी रोजी अविशेकनं आपण लग्न करणार नसल्याचं समुपदेशकाला कळवलं. त्यानंतर पीडितेनं पुन्हा नव्यानं तक्रार दाखल केली. त्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हाची नोंद करत आरोपीविरोधात आरोपपत्रही दाखल केलं.
बलात्काराच्या आरोपातून मुक्तता करण्यात यावी, यासाठी अविशेकने दिंडोशी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी तो अर्ज फेटाळून लावला. त्याविरोधात अविशेकनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर आरोपीला लग्न करण्याचा कोणताही हेतू नव्हता. अथवा त्याने पीडितेला खोट वचन दिलं होतं असं कुठेही म्हटलेले नाही. कारण त्या दोघांची पत्रिका जुळत नसल्यानं त्यानं लग्नाचं वचन मोडलं. त्यामुळे हे प्रकरण फसवणूक आणि बलात्काराचं नसून वचनभंगाचे असल्याचा युक्तिवाद आरोपीच्यावतीने करण्यात आला.