बीड : कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीत आलेल्या आणि त्यानंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झालेल्या करुणा शर्मा यांना अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. करुणा शर्मा यांना तब्बल 16 दिवस न्यायालयीन कोठडीत काढावे लागले आहे.
करुणा शर्मा यांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला म्हणून करुणा शर्मा यांच्यासह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर 6 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. अखेर आज न्यायालयाने करुणा शर्मांना जामिन मंजूर केला.
काय आहे प्रकरण?
मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशाखा रविकांत घाडगे यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार कलम 307 आणि अॅट्रोसिटी कायद्याखाली हा करुणा शर्मा आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परळीमध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर काल वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवलं व घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता.
न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर करुणा शर्मा यांनी लगेच जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, करुणा शर्मा यांनी जामीन अर्जावर सही केली नव्हती. माझा वकील आल्या शिवाय जामीन अर्ज करणार नाही, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं होतं. आपण हा गुन्हा केला नसल्याचं करुणा शर्मा यांनी कोर्टासमक्ष सांगितलं होतं. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
घटनाक्रम :
- 4 सप्टेंबर - करुणा शर्मा बीडमध्ये दाखल
- 5 सप्टेंबर - करुणा शर्मा परळीत, दिवसभर नाट्यमय घडामोडी, गुन्हा दाखल
- 6 सप्टेंबर - अंबाजोगाई सत्र न्यायालयासमोर हजर; करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी तर अरुण मोरे यास पोलीस कोठडी
- 7 सप्टेंबर - अरुण मोरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी
- 8 सप्टेंबर - करुणा शर्मांचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज, सुनावणीसाठी १४ सप्टेंबर तारीख
- 14 सप्टेंबर - न्यायाधीश रजेवर, जामीन अर्जावरील सुनावणी १८ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली
- 18 सप्टेंबर - न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद
- 20 सप्टेंबर - न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण
- 21 सप्टेंबर - करुणा शर्मा यांना सशर्त जामीन मंजूर