मुंबई :  बॉलिवूडचे बिग बी, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास दिलासा दिला आहे. बच्चन यांच्या जुहू येथील प्रतिक्षा बंगल्याचा काही भाग रस्ता  रूंदीकरणाच्या ताब्यात घेण्याकरता मुंबई महापालिकेनं बजावलेल्या नोटीसीला तात्पुरती स्थगिती देत यासंदर्भात तूर्तास कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टानं महापालिकेला दिलेत. मुंबई महापालिकेला रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जागा वाढवून घेऊ शकते. मात्र मागील चार वर्षात महापालिकेनं याबाबत कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप बच्चन यांच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आलाय.


अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतिक्षा बंगल्याची पुढची भिंत ही समोरच्या संत ज्ञानेश्वर महाराज रस्ता रूंदीकरणाच्या कामात अडथळा ठरत आहे. उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या या परिसरात संध्याकाळच्यावेळी या अरूंद रस्त्यामुळे ब-याचदा ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून साल 2017 मध्ये पालिकेनं या रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रस्ताव मान्य केला होता. ज्याला आसपासच्या इमारतीतील लोकांनी सकारात्मक प्रतिसादही दिला. अनेक सोसायटींनी आपली जागा पालिकेच्या स्वाधीन केली आहे. त्यामुळे प्रतिक्षाच्या भिंतीसह बंगल्याचा काही भाग ताब्यात घेण्यासाठी महापालिकेनं बच्चन यांना एप्रिल 2017 मध्ये दोन नोटीसा बजावल्या होत्या. याच नोटीसीविरोधात अमिताभ आणि जया बच्चन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. 


न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती एस एम मोडक यांच्या खंडपीठापुढे बुधवारी यावर सुनावणी झाली. न्यायालयानं बच्चन यांना नोटीसीबाबत महापालिकेकडे दोन आठवड्यात निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच यावर महापालिकेनं सहा आठवड्यात निर्णय घ्यावा. मात्र निर्णय घेतल्यानंतर तीन आठवडे त्यावर कोणतीही कठोर कारवाई करु नये, असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. तसेच जर आवश्यकता असेल तर बच्चन यांची बाजू वकिलांमार्फत अथवा व्यक्तिशः ऐकून घ्यावी असेही हायकोर्टानं आपल्या निर्देशांत स्पष्ट केलं आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha