हायकोर्टाचा याचिका ऐकण्यास नकार, जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 24 Oct 2018 12:40 PM (IST)
नाशिकमधील भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई : मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात नाशिकमधील भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. यामुळे जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी आता कायदेशीर अडथळा येणार नाही. हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा किंवा सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला देत, दिवाळीच्या सुट्टीनंतर आम्ही ही याचिका ऐकू, असं म्हटलं आहे. जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घेताच नाशिकमधील लोकप्रतिनिधींनी याला विरोध केला होता. जलसिंचन विभागाच्या निर्णयानुसार, आजपासून पाण्याच्या प्रवाह मार्गातील सर्व बंधारे मोकळे केले जाणार आहेत. यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. शिवाय या मार्गातील वीज पुरवठाही खंडित केला जाईल आणि मग सर्व तयारी झाल्यानंतर वरच्या धरणातून पाणी सोडलं जाईल. याची नेमकी वेळ निश्चित करण्यात आलेली नाही. जायकवाडीतील पाणी पिण्यासाठी राखीव जायकवाडी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरील धरणातील पाणी आल्यास आणि किती पाणी येते त्याचा विचार केल्यावरच शेतीला पाणी देण्याबाबत विचार होणार आहे. मात्र सध्या तरी जायकवाडी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी दिली आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद शहर आणि एमआयडीसी, जालना शहर आणि एमआयडीसी, परळी औष्णिक विद्युत केंद्राला देखील जायकवाडी धरणातून पाणी जाते. संबंधित बातम्या :