सोलापूर : मागील वर्षात 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या अतिवृष्टी आणि पुराचे भीषण परिणाम जिल्ह्याला भोगावे लागले. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्यात वाहून गेले. तर दुसरीकडे गुरे-जनावरे देखील वाहून गेले. तर मनुष्यहानी देखील झाली.


याचवेळी बार्शी शहरातील राणा कॉलनी येथे वास्तव्यास असलेले अजय उर्फ दादा अर्जुन चौधरी हे पूल ओलांडून घराकडे जात असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेले होते. प्रशासकीय यंत्रणा आणि नातेवाईकांनी शोध घेऊन देखील अजय यांचा पत्ता लागला नव्हता. त्यामुळे बार्शी पोलिसात अजय यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार देखील दाखल होती. मात्र धक्कदायक बाब म्हणजे तब्बल चार महिन्यांनी अजय यांच्या मृतदेहाचा सांगाडाच पोलिसांच्या हाती लागला आहे.


बार्शी शहराजवळील एका शेतालगत असलेल्या ओढ्यात काटेरी झाडांमध्ये एक मानवी सांगाडा अडकलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांना हा सांगाडा पुरात वाहून गेलेल्या अजय यांचाच असल्याची शंका आली. त्यावरुन त्यांनी अजय यांच्या पत्नीला घटनास्थळावर बोलावून घेतले. अजय यांच्या पत्नी आपल्या सासू, दीर यांच्यासमवेत घटनास्थळी पोहोचल्या. मानवी सांगाड्याच्या मानेच्या हाडाच शर्टचा तुकडा अडकलेला होता. याच शर्टच्या तुकड्यावरुन सापडलेला मानवी सांगाडा हा पुरात वाहून गेलेल्या अजय यांचाच असल्याचा जबाब मयताची पत्नींनी पोलिसात दिला आहे. तसेच सांगाड्याची बांधणी पाहता सागांडा आपले पती अजय यांच्या शरीरयष्टीची मिळता जुळता आहे. त्यामुळे ओढ्यामध्ये सापडलेला सांगाडा पतीचाच असून ते मयत झाले असल्याबाबत खात्री झाली असल्याचा जबाब मयत अजय यांच्या पत्नीने बार्शी पोलिसात दिला आहे.


अजय चौधरी हे 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास बार्शीतील तुळजापूर रोड रेल्वे पुलाजवळील ओढ्यातून पाण्यात वाहून गेले होते. अजय हे बाजार समितीत तोलार म्हणून काम करत होते. घरचा कर्ता माणूस गेल्याने परिवारावर शोककळा पसरलेली होते. तब्बल चार महिन्यांनी त्यांचा सांगाडाच हाती लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.