विरार : पावसाळा सुरु झाल्याने सध्या झाडपडीच्या (Tree) आणि अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे, मुसळधार पावसात (Rain) घरातून बाहेर पडण्यापूर्वी काळजी घ्यायला हवी. कारण, अंगावर झाड कोसळून अपघात झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी विरारमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे या दुर्घनटेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून दोन दिवसांनी ही बाब समोर आली. विरारमध्ये (Virar) दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मंजुळा झा या 70 वर्षीय वृध्द महिलेचा मृतदेह आज सकाळी विरारच्या बोळींज येथे आढळून आला. बुधवारी पावसामुळे चिंचेचे झाड पडून या महिलेचा मृत्यू झाला होता. मात्र,  ती झाडाखाली दबली गेल्याने दोन दिवस कुणालाही त्याबाबत समजले नाही.


मृतक मंजुळा झा ही महिला काही दिवसांपूर्वी विरार पश्चिमेच्या पद्मावती नगर येथील ऋषभ टॉवरमध्ये आपल्या मुलाकडे आली होती. सकाळी नातवाला शाळेत सोडून त्या मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. मंदिरात फुले वाहण्यासाठी त्या आसपासच्या परिसरातून फुले तोडून आणायच्या. बुधवार 19 जून रोजी नेहमीप्रमाणे नातवाला सोडण्यासाठी त्या बाहेर गेल्या आणि तेव्हापासून त्या बेपत्ताच झाल्या होत्या. घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. मात्र, कुठेही थांगपत्ता न लागल्याने, नातेवाईक आणि शेजारील परिसरात मित्र-परिवाराकडे विचारणा केल्यानंतरही त्यांच्याबाबत काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे, कुटुंबीयांनी याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल होती.


पोलिसांनी कुटुंबीयांकडून महिलेच्या दैनिक कामकाजाची माहिती घेतली, तिचा शोध घेत असताना पोलिसांना ती बोळींज येथे फुले तोडण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या परिसरात शोध घेतला असता चिंचेचे मोठे झाड रस्त्यावर पडलेले दिसले. त्यामुळे, पोलिसांनी तेथे शोध घेतला असता परिसरात दुर्गंधी असल्याचे लक्षात आले. तेव्हा पोलिसांनी झाड बाजूला केले असता मंजुळा झा यांचा मृतदेह झााडाखाली दबल्याचे आढळून आले. बुधवारी सकाळी वादळी पावासमुळे हे झाड पडले होते. 


एनडीआरएफच्या मदतीने झाड बाजूला केले


आम्ही एनडीआरएफच्या मदतीने झाड बाजूला करण्याचे काम केलं होतं. मात्र झाडाच्या प्रचंड फांद्या असल्याने महिला दिसून आली नाही. स्थानिकांनीही झाडाखाली कुणी नसावे असे सांगितले होते, अशी माहिती वसई विरार अग्निशमन विभागाचे प्रमुख दिलीप पालव यांनी दिली. मात्र, याच झाडाखाली संबंधित महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


हेही वाचा


Video : वट पौर्णिमेमुळे मोठी दुर्घटना टळली, बार्शीत फटाका कारखान्यात भीषण स्फोट; कानठळ्यांनी हादरला परिसर