नागपूर : आरोग्यसेवेत एक क्रांती घडली आहे. ड्रोनद्वारे रक्तपुरवठा करणारी टेक्नॉलॉजी आता आपल्या महाराष्ट्रात सुरु होणार आहे आणि त्याची सुरुवात केली आहे नागपुरातल्या तीन तरुणांनी.
या ड्रोनचं वजन 9 किलो आहे. त्यातून दीड किलो औषधं पोहचवली जाऊ शकतात किंवा दीड किलो वजनाच्या रक्ताच्या पिशव्याही नेता येतात.
एकदा इलेक्ट्रिक चार्जिंग केलं, की ड्रोन 105 किलोमीटर प्रवास करतो. विशेष म्हणजे पाऊस आणि वाऱ्याचा ड्रोनवर परिणाम होत नाही.
कठीण भूभाग, वाईट रस्ते, वाईट हवामान यांचा मोठा परिणाम ग्रामीण भागातील गावांना मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांवर होत असतो. ड्रोनने रक्त पोहचवताना पैसा तर वाचेलच, शिवाय अडचणींवरही मात करता येईल.
या भन्नाट आयडियाची सुरुवात झाली डोंगराळ भागातल्या नेपाळमधून. अमेरिकेसह प्रगत राष्ट्रांमध्ये मेडिकल ड्रोनला परवानगी मिळाली आहे. भारतात तसं झालं, तर डोंगरदऱ्यात अडल्या-नडलेल्यांना आरोग्य सुविधा तातडीने मिळू शकतील. त्यामुळे ही ड्रोन सेवा आरोग्य क्षेत्रातली देवदूत ठरेल.