नाशिक : नाशिकमधील वेदांत मुंदडा याने नेत्रदीपक यश संपादित केलं आहे. दृष्टीहीन असूनही वेदांतने 90.31 टक्के गुण मिळवले. वेदांत दीड वर्षांचा असतानाच नियतीने त्याची दृष्टी हिरावून घेतली. त्याने आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर चमकदार कामगिरी करून नेहमीच चांगली कामगिरी करत डोळस विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आहे.
वाणिज्य शाखेतून अकरावीला केटीएचएम महाविद्यालयात सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या गटात प्रवेश घेत बारावीच्या परिक्षेत त्याने 90.31 टक्के गुण मिळवले आहेत.
डोळस विद्यार्थ्यांनाही लाजवेल अशाप्रकारे सातत्याने शैक्षणिक क्रिडा, संगीत अशा सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडी घेतलेल्या नाशिकच्या वेदांत मुंदडा या दृष्टिबाधित विद्यार्थ्याने दहावीप्रमाणे बारावीच्या परिक्षेतही ९०.३१ टक्के गूण मिळवित नेत्रदिपक कामगिरी केली आहे. तो दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये राज्यात आघाडीवर आहे.
केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर वेदांत हा संगीत, कला, क्रिडामध्येही आघाडीवर आहे. नियतीने वेदांत दीड वर्षांचा असताना त्याची दृष्टी हिरावून घेतली. मात्र त्याला अष्टपैलू कामगिरीसाठी लागणारे सर्व काही कलागुण उपजत दिले.
जिद्द, आत्मविश्वास आणि पालकांच्या दमदार पाठिंब्यामुळे आपल्या व्यंगावर मात करीत अभ्यासापासून खेळापर्यंत नैपुण्य मिळविले आहे. वेदांतला तबला विशारद व सनदी अधिकारी होण्याची इच्छा आहे. त्याने तबला वाजवण्याचे चोख धडे घेत पाच परीक्षाही उत्तीर्ण केल्या आहेत. खुल्या मैदानात आणि घराच्या आवारात पालकांच्या देखरेखीखाली वेदांत सायकल, दुचाकीदेखील चालवितो एवढेच नव्हे तर संगणकापासून तर बुध्दीबळ अन् क्रिकेटसारख्या खेळांमध्येही तो आपले कौशल्य दाखवून देतो.