नागपूर : नागपूरमधील मानस अॅग्रोमध्ये बायोडायजेस्टरमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्वीच्या पूर्ती साखर कारखान्याचे नाव आता मानस अॅग्रो आहे. हा कारखाना नागपूर जिल्ह्यातील बेला गावाजवळ हा कारखाना आहे.


मानस अॅग्रोमध्ये बायोडायजेस्टरचे वेल्डिंग सुरू होते. ते ज्या कंपनीला काम दिले होते त्याचे लोक तिथे आता काम करत होते. वेल्डिंगचे काम करत असताना तिथे स्फोट झाला आणि वेल्डर्सपैकी 5 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.



मंगेश प्रभाकर नौकरकर (वय 21), लीलाधर वामनराव शेंडे (वय 47), वासुदेव विठ्ठल लडी (वय 30), सचिन प्रकाश वाघमारे (वय 24) आणि प्रफुल्ल पांडुरंग मुन (वय 25) अशी मृतांची नावं आहेत. हे सर्व वडगाव येथील रहिवाशी आहेत.


मृतांचे नातेवाईक आणि गावातील लोक घटनास्थळी गोळा झाले होते. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक आणि गावकऱ्यांनी नकार दिला होता. मॅनेजमेंटमधून कोणीतरी यावे मगच मृतदेह ताब्यात घेऊ अशी मागणी त्यांनी केली होती. नागपूरचे पोलील अधीक्षक  राकेश ओला आणि उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे घटनास्थळी दाखल झाले होते. अखेर मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.


अत्यंत दुर्दैवी घटना, सर्वतोपरी सहकार्य करणार


नागपूर जिल्ह्यातील बेला येथे असलेल्या मानस ऍग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या युनिट वन परिसरात शनिवारी दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी सव्वादोन ते अडीच वाजताच्या दरम्यान जी दुर्दैवी घटना घडली ती अत्यंत वेदनादायी आहे. मानस अॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड युनिट वन परिसरात बायो डायजेस्टरच्या वेल्डिंगचे काम सुरू होते. मानसने हे काम बाहेरील कंत्राटदाराला ठेक्याने दिले आहे. वेल्डिंगचे काम करीत असताना शनिवारी दुपारी सव्वादोन ते अडीचच्या सुमारास अचानक स्पोट झाला ज्यामध्ये पाच मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर दुर्घटनेची माहिती मिळताच मानसचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले. झाल्या प्रकाराबाबत पोलिसांना अधिकृत माहिती देण्यात आली आणि त्यांच्या माध्यमातून या दुर्घटनेची चौकशी होईल. परंतु यामध्ये ज्या मजुरांचा दुःखद अंत झाला, त्यांच्या परिवाराच्या दुःखात मानस समूह सहभागी असून शक्य ती सर्व मदत व सहकार्य करण्यात येईल, असं कंपनीचे जनसंपर्क अधिकारी नितीन कुळकर्णी यांनी म्हटलं.