बेळगाव : कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकात काल (21 ऑक्टोबर) झालेल्या स्फोट प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. कारण स्फोटाच्या संशयित पार्सलवर कोल्हापुरातील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांचं नाव आहे. आबिटकर हे राधानगरी मतदारसंघाचे आमदार आहेत.
हुबळी रेल्वे स्थानकावर काल झालेल्या स्फोटात हुसेनसाब नईवाले हा तरुण गंभीर जखमी झाला. स्टेशनवर आलेल्या एका पार्सलमधील संशयित वस्तूच्या माध्यमातून हा स्फोट झाला होता. अशा प्रकारचं पार्सल प्रकाश आबिटकर यांच्या नावे आल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना आमदार निशाण्यावर होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काल आरपीएफच्या जवानाला अमरावती एक्सप्रेसमध्ये एक बॉक्स सापडला. संशयास्पद वाटल्याने त्याने तो बॉक्स प्लॅटफॉर्मवर आणला. हा बॉक्स त्याने रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या हुसेनसाब नईवाले याला उघडण्यास सांगितला. हा बॉक्स उघडत असतानाच स्फोट झाला आणि त्यात हुसेनसाब जखमी झाला असून त्याला उपचारासाठी किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्फोट झाल्यावर पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे स्थानकावरील पोलीस बंदोबस्तात वाढही करण्यात आली आहे. तसेच श्वानपथक, बॉम्बविरोधी पथक, स्फोटकतज्ज्ञांनादेखील पाचारण करण्यात आले होते.
पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली स्फोटाची चौकशी सुरू असून सर्वत्र दक्षतेचे आदेश देण्यात आले असल्याचे गृहमंत्री बसवराज बोंमाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान डुकराना मारण्यासाठी वापरण्यात येतात, तशा प्रकारची स्फोटके बॉक्समध्ये होती, अशी प्राथमिक माहिती तपासात उपलब्ध झाली आहे.
हुबळी रेल्वेस्टेशनवर स्फोट, स्फोटकांच्या पार्सलवर शिवसेना आमदाराचं नाव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Oct 2019 06:28 PM (IST)
कर्नाटकमधील हुबळी रेल्वेस्थानकावर काल एक मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात एकजण जखमी झाला होता. स्फोटाच्या या घटनेला आज वेगळंच वळण मिळालं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -