औरंगाबाद : नोटाबंदीच्या निर्णयानंतर काळा पैसेवाल्यांनी जुन्या नोटांची विल्हेवाट लावायला वेगवेगळे पर्याय शोधले आहेत. औरंगाबाद शहरात दोन ठिकाणी पाचशेच्या नोटा फेकण्यात आल्या आहेत.

औरंगाबादमध्ये जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा कापून फेकण्यात आल्या आहेत. सुतगिरणी चौकात या कापून फेकलेल्या नोटा दिसताच स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. याशिवाय साईनगर भागातही पाचशेच्या फाटक्या नोटा मिळाल्या. पाचशेच्या नोटा बघण्यासाठी लोकांनीही मोठी गर्दी केली होती.

उस्मानाबादेतही वाघोली शिवारात पाचशे आणि हजारच्या नोटा फाडून फेकण्यात आल्या होत्या.

सध्याच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळे पैसे पांढरे करता येत नाहीत आणि लपवूनही ठेवता येत नाहीत, अशी अवस्था काळा पैसा बाळगणाऱ्यांची झाली आहे. यापूर्वी  पुण्यातील कचऱ्यात आणि काशीमध्ये गंगा नदीत जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा सापडल्या होत्या.