नाशिक/धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन फक्त काळे पैसेवाले, दहशतवादी आणि नकली नोटा बनवणाऱ्यांचं कंबरडं मोडलंय, असं नाही तर भुरट्या चोरट्यांचाही बंदोबस्त केला आहे.
कारण नाशिकजवळच्या घोटीत राहणाऱ्या दिलीप रोकडेंच्या घरी दोन दिवसांपूर्वी चोरी झाली. मात्र चोरट्यांनी घरातून जाताना हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांकडे ढुंकूनही बघितलं नाही.
10-20 च्या नोटांसह सिलेंडरही नेले
दिलीप रोकडे हे वीज मंडळात कंत्राटी कामगार आहेत. तर पत्नी अपंग आहे. चोरट्यांनी जाताना फक्त शंभर, दहा-वीस रुपयांच्या नोटाच खिशात घातल्या आणि घरातील दोन सिलेंडरही चोरुन नेले. त्यामुळे आर्थिक नुकसान कमी झालं, पण खायचे वांदे झाले आहेत.
चार हजारांची चिल्लर घेऊन चोरटे पसार
तर धुळ्यातील देवपूर परिसरात राहणाऱ्या श्याम पाटील यांच्या घरी दिवसाढवळ्या चोरी झाली. कडी-कोयंडे तोडून चोरटे घरात घुसले. पण त्यांनी फक्त चार हजार रुपयांची चिल्लर घेऊन पोबारा केला. मात्र घरातील इतर मोठ्या नोटांना हातही लावला नाही.