नागपूर : नागपुरातील अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात केल्या जाणाऱ्या कारवाईविरोधात भाजप आणि संघ मैदानात उतरले आहेत. महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेरच लोटा-गोटा आंदोलन करण्यात येत आहे.


गल्ली ते दिल्ली सर्वत्र सत्तेत असणाऱ्या भाजपचे कार्यकर्ते नागपुरात आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे अनेक कार्यकर्तेही रस्त्यावर दिसत आहेत. याचं कारण म्हणजे नागपुरात तोडली जात असलेली धार्मिक स्थळं.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरु आहे. सुरुवातीला ही कारवाई रस्त्याच्या अगदी मध्यभागी असणाऱ्या, वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या धार्मिक स्थळांवर झाली.

अंतर्गत वस्त्यांमध्ये असणारी मंदिरे, खुले भूखंड, व्यक्तिगत मंदिरांवर ही कारवाई सुरु झाली आणि नागपुरातील वातावरण तापू लागलं. सत्तेतीलच मंडळी रस्त्यावर दिसत आहेत. ठिकठिकाणी आज याविरोधात आंदोलन सुरु आहे.

महापालिकेच्या आयुक्तांच्या चेंबरबाहेर लोटा गोटा आंदोलन सुरु आहे. महापालिकेच्या ऑफिसमध्ये संघ आणि इतर संघटनांशी निगडित मंडळी भजन करत बसली आहेत. महाआरती केल्या जात आहेत.