Sindhudurg Districk Bank Election :  सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 30 डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत 19 पैकी 18 प्रभागात एकास एक लढत तर कुडाळ तालुका शेती संस्थांमधून भाजपचे उमेदवार सुभाष मडव यानी बंडखोरीचे रणशिंग फुंकल्याने तिरंगी लढत आहे. तर 31 डिसेंबरला जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे स्वतः लक्ष घालून आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेत भाजप की महाविकास आघाडी सत्ता राखणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. केंद्रात नारायण राणेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. नगरपंचायतच्या निवडणुकासाठी मतदान जरी झालं असल तरी मतमोजणी बाकी आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडल्या होत्या. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निकालावर सर्वांचं लक्ष लागले आहे. 


जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन आणि महाविकास आघाडीचे पॅनेलप्रमुख सतीश सावंत हे शेती संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपच्यावतीने विठ्ठल देसाई रिंगणात असून लक्षवेधी दुरंगी लढत आहे. या मतदारसंघात तिसरे उमेदवार सुशांत नाईक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने दुरंगी लढत होत आहे. नागरी सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक यांच्यात लढत होत आहे.


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 19 संचालकपदासाठी 91 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामधून 22 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे कुडाळ वगळता सर्व ठिकाणी दुरंगी लढत होत आहे. कुडाळ शेती उत्पादन मतदारसंघातून प्रकाश मोर्ये (भाजप), सुभाष मडव (भाजप) तर महाविकास आघाडीचे विद्या प्रसाद दयानंद बांदेकर अशी तिरंगी लढत होत आहे. या तिरंगी लढतीमुळे शेती उत्पादनाच्या मतदारसंघात भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते.


महिला प्रतिनिधी मतदारसंघातून होणाऱ्या या लक्षवेधी निवडणुकीत कणकवलीत प्रज्ञा ढवण ,अस्मिता बांदेकर (भाजप) विरुद्ध कुडाळ येथील नीता राणे व सावंतवाडीच्या अनारोजी लोबो (महाविकास आघाडी) यांच्यात लढत होणार आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आत्माराम ओटवणेकर विरुद्ध भाजपचे सुरेश चौकेकर यांच्यात लढत होणार आहे. इतर मागास मतदारसंघातून होणाऱ्या दुरंगी लढतीत भाजपचे रवींद्र मडगावकर विरुद्ध महाविकास आघाडीचे मनिष पारकर यांच्यात लढत होणार आहे. विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून भाजपचे गुलाबराव चव्हाण आणि महाविकास आघाडीचे मेघनाथ धुरी यांच्यात लढत होत आहे.


जिल्हा बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था ग्राहक सहकारी शेती संस्था या मतदारसंघातून उभे असून भाजपचे विद्यमान संचालक अतुल काळसेकर यांच्यात लक्षवेधी लढत होणार आहे. औद्योगिक सहकारी मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटर वाहतूक संस्था या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे लक्ष्मण उर्फ बाबा आनंद आंगणे विरुद्ध भाजपाचे गजानन गावडे यांच्यात लढत होत आहे. मच्छिमार सर्व दूध संस्था कुकूटपालन वराह पालन जनावरे पैदास संस्थांमधून महाविकास आघाडीचे एम. के. गावडे विरुद्ध भाजपचे महेश सारंग यांच्यात लढत होत आहे. विणकर घरबांधणी देखरेख संस्था मतदार संघातून महाविकास आघाडीचे विनोद रामचंद्र मर्गज विरुद्ध भाजपचे संदीप परब यांच्यात लढत होत आहे. सर्व बिगर सहकारी संस्था मतदारसंघातून भाजपचे समीर रमाकांत सावंत विरुद्ध महाविकास आघाडीचे विकास सावंत यांच्यात लढत होणार आहे.


शेती संस्था मालवण मतदारसंघातून महाविकास आघाडीचे विक्टर डाट्स विरुद्ध भाजपचे कमलाकांत कुबल यांच्यात लढत होत आहे. शेती संस्था सावंतवाडी मतदार संघातून भाजपचे गुरुनाथ पेडणेकर विरुद्ध महाविकास आघाडीचे विद्याधर परब यांच्यात लढत होत आहे. शेती संस्था दोडामार्ग तालुका मतदारसंघमधून भाजपचे प्रकाश गवस विरुद्ध महाविकास आघाडीचे गणपत देसाई यांच्यात लढत होत आहे. शेती संस्था देवगड तालुका मतदारसंघातून भाजपचे प्रकाश बोडस विरुद्ध महाविकास आघाडीचे अविनाश माणगावकर यांच्यात लढत होत आहे. शेती संस्था वैभववाडी तालुका मतदार संघातून भाजपाचे दिलीप रावराणे विरुद्ध महा विकास आघाडीचे दिगंबर पाटील तर शेती संस्था वेंगुर्ले मतदारसंघातून भाजपाचे मनीष दळवी विरुद्ध महा विकास आघाडीचे विलास गावडे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.


राणेंची प्रतिष्ठा पणाला


19 मतदारसंघात 981 मतदार आहेत. गेली तीन टर्म या बँकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. पण गेल्या पाच वर्षात राजकीय पटलावर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर राणेचे खंदे समर्थक असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते काका कुडाळकर, सतीश सावंत हे सोबती दुरावले. राणे केंद्रात सत्तेत आहेत. तर नव्याने केंद्रात सहकार खात तयार केलं गेलं असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सहकार खाते सुरू करण्यात आल्याने राणे यांना आपली ताकद सिध्द करून दाखविण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत सिंधुदुर्गच्या होमपिचवरील जिल्हा बँकेची निवडणूक जिंकायचीच आहे. त्यासाठी त्यांनी सर्व ती ताकद पणाला लावली आहे. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारात काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे वर्चस्व आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सन 2008 मध्ये झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीत सहकारातील त्यावळचे नेते दिवंगत डी. बी. ढोलम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे दिवंगत शिवरामभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा पराभव करून जिल्हा बँक ताब्यात घेतली. त्यानंतर गेली तीन टर्म राणे यांनी जिल्हा बँकेवर आपले वर्चस्व कायम ठेवले.