Sindhudurg News : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील कणकवली येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे आणि संदेश सावंत यांच्या अटकपूर्व जामीनावर मंगळवारी येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी झाली. प्रदीर्घ कालावधीनंतर सरकारी वकिलांचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्यानं या प्रकरणावर आज बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी कणकवली येथे जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपीसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.


राणेंच्या अटकेसाठी ठाकरे सरकारकडून दबाव


आमदार राणे यांच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. संग्राम देसाई म्हणाले संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयितांची नावं पोलिसांनी गुप्त का ठेवली आहेत? राणेंना अटक करण्यासाठी ठाकरे सरकारकडून दबाव आहे. 24 आणि 25 डिसेंबरला आमदार नितेश राणे आणि संदेश सावंत यांची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली, मग आता पोलिसांना ताबा कशासाठी हवा आहे? हा सर्व ठरवून कट करण्यात आला आहे, असं म्हटलं. 


चार तास युक्तीवाद


जिल्हा न्यायालयात मंगळवारी दुपारी साडेतीन वाजल्यापासून सुरु झालेली सुनावणी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत चालू होती. आमदार राणे यांच्या वतीने अॅड. राजेंद्र रावराणे आणि ॲड. संग्राम देसाई, ॲड. उमेश सावंत यांनी अटकपूर्व जामीन मंजुरीसाठी जोरदार युक्तिवाद केला होता. तर सरकारी पक्षातर्फे नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यासाठी जोरदार युक्तिवाद करण्यात आला, तो अपूर्ण राहिला आहे.


हल्ला प्रकरणात नितेशला गोवलं जातंय; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आरोप 
  
सत्ताधारी आणि प्रशासन आमच्या विरोधात काम करत आहे. हल्लाप्रकरणात विनाकरण आमदार नितेश राणे यांना गोवण्यात आलं आहे. केवळ खरचटलं त्यासाठी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि इतर अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात याचा अर्थ पोलीस दबावाखाली काम करत आहेत. आमदार राणे यांचा कोणताही संबंध नसताना गुन्हे दाखल केले गेले आहे. आम्ही त्या विरोधात लोकशाही पद्धतीनं कायदेशीर लढाई लढणार आहोत, अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. राणे म्हणाले की, मी केंद्रीय मंत्री आहे, नितेश राणे आमदार आहेत. त्यामुळे आम्ही मैदान सोडून पळणार नाही. यावेळी नितेश आणि कुठे आहे? हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का? अशी संतप्त प्रतिक्रिया पत्रकारांच्या प्रश्नावर राणे यांनी व्यक्त केली. कणकवली येथे मंगळवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते. 


नितेश राणे यांच्या शोधार्थ महाराष्ट्र पोलीस पथक गोव्यात


भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेतील आमदार नितेश राणे यांना शोधण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे पथक गोव्यात दाखल झाले आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याच्या प्रकरणात राणे यांच्यावर ठपका असून त्यांच्या शोधात महाराष्ट्र पोलीस आहे. राणे हे गोव्यात असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांना मिळाल्यामुळे महाराष्ट्र पोलिसांचे एक पथक गोव्यात दाखल झालं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.