नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपतर्फे आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजय बाईक रॅली काढण्यात आली. नाशिक मध्य विधानसभेच्या वतीने आज सकाळी 10 वाजता भाजप कार्यालयापासून शहरात बाईक रॅली काढण्यात आली. मात्र या रॅलीत एकाही कार्यकर्त्याने हेल्मेट परिधान केलेले नव्हते. यासोबतच अनेक कार्यकर्ते ट्रीपल सीट वाहन चालवतांना दिसून आले. एरव्ही सर्वसामान्य नागरिकांवर हेल्मेट न घातल्याने कारवाई करुन 500 रुपयांची पावती फाडणारे पोलीस यावेळी बंदोबस्ताला तर होते, मात्र त्यांच्याकडून राजकीय दबावामुळे कुठलीच कारवाई झालेली बघायला मिळाली नाही. सोलापुरात विनापरवानगी रॅलीमुळे कारवाईची शक्यता सोलापुरात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. आज देशभरात विजय संकल्प बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येतं आहे. सोलापुरातही भाजपतर्फे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत रॅलीची सुरुवात करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा निवडून आणण्याचा संकल्प करत देशभरात आज या विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया विजयकुमार देशमुख यांनी दिली. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी,  माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्यासह अनेक कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. दरम्यान पोलिसांच्या वतीने या रॅलीची परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांच्या वतीने आयोजकांवर कारवाई करण्याची शक्यता आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांसह भाजपचे दिग्गज नेते या रॅलीत सहभागी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत वांद्रे कॉजवे इथून बाईक रॅलीला फ्लॅग ऑफ करण्यात आला,  तिकडे नागपुरातही पाच ठिकाणी रॅली काढण्यात आली.