मुंबई : आम्ही जनसंघापासून काम सुरु केलं. जनसंघ त्यावेळी अगदी मिणमिणता दिवा होता. 1968 साली मी पूर्णवेळ काम करायचं ठरवलं. मी त्यावेळी संघटनमंत्री होतो. त्यावेळी आम्हाला उमेदवार मिळत नसायचे. उमेदवार मिळाले आणि त्यांचे डिपॉझिट वाचले तरी आम्हाला आनंद व्हायचा, असे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी संघटनमंत्री असताना स्कुटरवरून फिरायचो. पूर्ण मुंबई त्यावेळी पिंजून काढायचो. अशा स्थितीतून आज जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष झालाय. याचा खूप आनंद आहे, असे नाईक म्हणाले.

नाईक म्हणाले की, भाजपचं वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे संघटना आहे. ही संघटना विचारावर आधारित आहे. हरलो तरी विचारांसाठी हरलो आणि जिंकलो तरी उन्माद नाही, अशी विचारधारा असल्याने पक्ष मोठा झाला. इथं काम करण्याचा आनंद म्हणजे विचारधारेमुळे जास्त येतो. विचारांमुळे ताकद येते. आमच्या जुन्या नेत्यांचे विचार आमच्यात आहेत. त्या विचारांची ताकत अजूनही भाजपमध्ये आहे.  काँग्रेसमधील अशी ताकत कमी झाली. त्यामुळे काँग्रेसची आज ही अवस्था झाली आहे, असेही ते म्हणाले.

अटलजी-अडवाणींची भाजप आणि मोदी-शाहांची भाजप यामध्ये फक्त पिढीचे अंतर आहे. मात्र वैचारिक भूमिका मात्र एकच आहे. तत्व महत्वाचे आहे आणि ते तत्व दोन्ही पिढीमध्ये एकच आहे, असे नाईक म्हणाले.

मी भाजप अनुशासन समितीचा अध्यक्ष असताना वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी उमा भारती आणि मदनलाल खुराणा यांची हकालपट्टी केली होती. साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर कारवाई न झाल्याबाबत विचारले असता नाईक म्हणाले की, हा पिढीमधील फरक आहे. पिढीमध्ये काही बदल होत असतात. पक्षात अनुशासन आहे. परंतु हे सगळं होत असताना आपली दिशा योग्य असावी, असेही ते म्हणाले.

माझ्यावर मंत्री असताना काही आरोप केले गेले. मात्र ते सिद्ध होऊ शकले नाहीत. माझ्या विरोधात आरोप झाल्यानंतर मी व्यथित झालो होतो. मात्र मी घाबरलो नव्हतो. अटलजी आणि सगळेजण माझ्या मागे उभे होते. त्यावेळी कारगिल युद्धात आपले खूप जवान शहीद झाले होते. त्यावेळी मी शहीदांच्या परिवारांना पेट्रोलपंप आणि गॅस एजन्सी दिल्या. या निर्णयाचं खूप कौतुक झालं, असे ते म्हणाले.