योग्य वेळी योग्य त्या गोष्टींचं कौतुक केलंच पाहिजे. पण, ज्या लोकसभा निवडणुका बेरोजगारी, आर्थिक मंदीच्या विषयांवर व्हायला हव्या होत्या त्या इतर मुद्द्यांवर झाल्या असल्याचे ते म्हणाले
पाकिस्तान विरोधातील कारवाई, कलम 370 हटवणं, ट्रिपल तलाक कायदा याला आमचा पाठिंबा आहे. त्याबद्दल मोदी सरकार, अमित शाह यांचं वेळोवेळी अभिनंदनही केलं आहे. पण, आता देशाला आर्थिक खाईत लोटण्याचं समर्थन कसं करणार, असे राऊत म्हणाले.
आज ऑटोमोबाईल सेक्टर, लहानमोठे उद्योगधंदे धोक्यात आहेत. लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. लोकांना जीएसटी काय, नोटबंदीमुळे काय झालं याच्याशी घेणं-देणं नाही. त्यांना त्यांची रोजीरोटी महत्वाची आहे. सरकारच्या कोणत्याही निर्णयानं जर रोजगार जात असेल तर असा निर्णय लोकांच्या दृष्टीनं घातकच आहे, असा आरोपही राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रातल्या उद्योगांवरही मोठं आरिष्ठ आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर भूमिका घेतली पाहिजे. बाहेरच्या राज्यातले उद्योगधंदे ठप्प होत आहेत. तिथले लोंढे महाराष्ट्रात येतील त्याचं तुम्ही काय करणार? असा सवालही त्यांनी केला.
विधानसभा निवडणुका या राज्यातील प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, बेरोजगारीच्या प्रश्नावर व्हायला हव्यात असेही ते म्हणाले. मुंबई ही औद्योगिक नगरी राहिली नाही हे दुर्देव असल्याचेही ते म्हणाले.
हा प्रश्न युतीचा नाही, प्रश्न राष्ट्रीय आहे. त्यामुळे, निवडणूक वेगळी आणि धोरणात्मक निर्णय घेणं वेगळं, असेही ते म्हणाले. आमच्याकडं केंद्रात अवजड उद्योग खातं आहे. आमच्याकडं कोणतंही धोरणात्मक निर्णय घेणारं खातं नाही, असेही ते यावेळी म्हणाले.