सांगली : भाजपाला शेतकऱ्यांची जिरवायची आहे म्हणूनच परदेशातून शेती माल आयात करण्यात येत आहे. पाकिस्तानातून देखील कांदा आयात करण्यात येत आहे. पाकिस्तान पेक्षा भाजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो अशी घणाघाती टीका महसूलमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यश बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली आहे.


केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरियाणा राज्य तापून उठले आहे . तेथे आजही आंदोलन सुरू आहे. अद्याप राज्यातील शेतकऱ्यांना चिमटा बसला नसला तरी धोका कायम आहे. आज शिल्लक साखरेचा प्रश्न गंभीर असताना निर्यात बंदी केली . याचा अर्थ शेतकऱ्यांची जिरवायची आहे. कांदा आयात करायला सुरवात केली. पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची चर्चा सुरू आहे. म्हणजे आज देशातील भाजप सरकारला पाकिस्तानपेक्षा शेतकरी मोठा शत्रु वाटतो. दुधाची पावडर मोठ्या प्रमाणात शिल्लक असताना केंद्र सरकार परदेशातून पावडर आयात करण्याचा निर्णय घेते. दूध भाव न वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. तशातच कृषी विरोधी कायदे आणले आहेत. त्यामुळेच कायद्याविरोधात काँग्रेसने एल्गार केला आहे.


अमेरिकेतील ट्रम्प यांच्या पराभवाच्या शक्यतेवरून थोरात यांचा मोदी सरकारला टोला लगावला


ट्रम्पनी काळा-गोरा असा भेद केला तणाव निर्माण करून मतं गोळा करण्याचा प्रयत्न केला. पण जो जनतेत भेद निर्माण करतो त्याचा पराभव होतो, हे आता जगातील नवे चक्र सुरू झाले आहे. भेदभाव करून राजकारण करता येणार नाही असा सांगणारा निर्णय होतोय आणि हा निर्णय भारतात देखील झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास देखील थोरात यांनी व्यक्त केलाय. केंद्र मूठभर लोकांसाठी काम करत आहे. केंद्र सरकारने धर्माचे नाव घेऊन भेदभाव करायचा, आपली पोळी भाजायची...पाहिजे तेवढा अन्याय जनतेवर करायचा, जनता काही बोलत नाही. पण हे आता चालणार नाही असा इशारा थोरात यांनी व्यक्त केला. राज्यात आता काँग्रेसची लाट येणार आहे. संपूर्ण राज्यात अनेक मंडळी काँग्रेस मध्ये येणार असून राज्यात काँग्रेसचे राज्य निर्माण झालेले दिसेल असे संकेतही प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेत.


कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय विरोध होऊ लागला आहे. या कायद्याविरोधात काँग्रेस पक्षही देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातही या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्ष संघर्ष सुरू केलाय. केंद्र सरकारने नव्यानं आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सांगलीच्या एसटी स्टँड परिसरातून ही रॅली सुरू झाली. नेमीनाथ नगर येथे रॅलीचा समारोप करण्यात येत आहे. जवळपास 800 ट्रॅक्टर या रॅलीत सहभागी झालेत. कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली.


लोकशाही नव्हे तर हुकूमशाही पद्धतीने केंद्र सरकारने चर्चा न करता कायदे केले आहेत , अशी टीका डॉ . विश्वजीत कदम यांनी केलीय.शेतकऱ्यांचे नुकसान करणारा हा कायदा कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना समजून सांगितला पाहिजे . उद्योगपतींच्या स्वार्थापोटी हे कायदे संमत केले आहेत . त्यामुळे काँग्रेसने त्याविरोधात उठाव केला आहे. कायद्यामुळे मार्केट कमिटी उद्ध्वस्त होणार आहे . त्यामुळे कायद्याविरोधात सर्वांनी एकजुठ दाखवावी, असे आवाहन कदम यांनी केले. परतीच्या पावसाने निर्माण झालेल्या संकटात शेतकरी सापडला. शेतकऱ्यांना आमच्या सरकारने मोठी मदत केली.अजून मदत शेतकऱ्यांना करायची इच्छा होती मात्र करूनच संकट निर्माण झालं. केंद्र सरकारला जानेवारी -फेब्रुवारी मध्ये परदेशातून कोरोनाचे संक्रमण होतंय हे माहीत होतं , पण यांना फेब्रुवारीमध्ये ट्रम्प आणायचे होते. मार्च मध्ये कट कारस्थान करून मध्य प्रदेशात निवडून आलंल काँग्रेस सरकार पाडायचं होतं. म्हणून यानी स्वतःच्या स्वार्थासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय लांबवला आणि 22 मार्चला एकदम लॉकडाऊन करून जनतेला वेठीस धरले असे म्हणत कदम यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जिल्ह्यात कोणी काहीही वेगळा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेसवर काही फरक पडणार नाही . आम्ही सारे एक आहोत आणि एकजुटीने एकत्र राहू , असा सूचक इशारा काँग्रेस नेते , कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी येथे दिला .