Raosaheb Danve :  राज्यात होणाऱ्या ईडी आणि सीबीआय कारवाईवर कांगावा करणाऱ्या नेत्यांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी देखील केंद्रीय यंत्रणेचा वापर करुन नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा छळ केला होता, याची आठवण रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना करुन दिली. ते शिर्डीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  


यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, ‘भाजपाच्या लोकांना ईडीचा आणि सीबीआय त्रास झाला नाही असे तुमचा आरोप आहे.? पण नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सीबीआयकडून त्यांचा किती छळ झाला याची जाणीव काँग्रेसच्या नेत्यांना नाही का? सीबीआय चौकशी झाल्यानंतर नरेंद्र मोदी जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी पत्रकारांना फक्त नमस्कार करून निघून गेले होते. मात्र नवाब मलिक यांना ईडीने पकडल्यानंतर त्यांनी फारच बहादूरी केल्यासारखा हात वर करून जल्लोष केला. ही काय वागण्याची पद्धत झाली का..? काँग्रेस सत्तेत असताना अमित शाहा यांना जेलमध्ये टाकलं, नरेंद्र मोदींचा छळ केला, तेव्हा आम्ही असेच आरोप केले का? सुरेश कलमाडी, अशोक चव्हाण आणि लालू प्रसाद यादव यांची चौकशी सीबीआयने केली तेव्हा आमचे सरकार होते का? हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनावाल्यांना दिसत नाही का? त्यामुळे सध्या बिलकुल सुडाचे राजकारण सुरू नाही, असे रावसाहेब दानवे म्हणाले. 


संभाजी राजे यांच्या उपोषणाला आमचा पाठींबा -
भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं होतं. त्याला हायकोर्टात चॅलेंज दिले गेले. सरकारने वकिलांची फौज उभी करून, पुरेसे पुरावे गोळा करून आरक्षण टिकवण्यात यश मिळवले होते. परंतु दुर्दैवाने आमचं सरकार गेले आणि सुप्रीम कोर्टात याला चॅलेंज झाले. आता या तीन पक्षाच्या सरकारने एकत्र बसून जर वकिलांची फौज उभी केली असती, कोर्टाला अपेक्षित असलेले पुरावे सादर केले असते तर सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकवता आले असते. तामिळनाडूसारख्या राज्यात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिले, कारण योग्य ती बाजू त्यांनी कोर्टासमोर मांडली. मात्र हे राज्य सरकारने अपयश असून मराठा समाजावर त्यांनी अन्याय केला आहे. राज्य सरकारने संभाजी राजेंना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केली नाही. त्यांच्या उपोषणाला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे, असे दानवे म्हणाले.


नारायण राणेंवरील गुन्हा म्हणजे सुडाचे राजकारण -
दिशा सालीयनबद्दल केवळ एकटेच नारायण राणे बोलले असे नाही. आगोदार देखील ते बोलले तेंव्हा गुन्हा दाखल झाला नाही. मात्र यांच्या राज्यातील एका मंत्र्याला दाऊदची इब्राहिमची प्रॉपर्टी खरेदी केल्या प्रकरणी अटक केली.नवाब मालिकांना अटक झाली म्हणून राज्यातल्या तीन पक्षाच्या सरकारमधील मंत्र्यांनी उपोषण केले. दाऊद इब्राहिमला पाठिंबा देण्यासाठीच हे उपोषणाला बसले की काय? अशा प्रकारची शंका या राज्यातल्या जनतेच्या मनात आता यायला लागली आहे. एकीकडे कायदेशीर कारवाई करतो असे दाखवायचे आणि दुसरीकडे बेकायदेशीर पद्धतीने गुन्हे दाखल करतात सूड भावनेने राजकारण करतात. नारायण राणे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हे सुडाचे राजकारण आहे..


...म्हणून राज्य सरकारकडून प्रत्यारोप सुरू -
राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नावरून लक्ष विचलीत करण्यासाठी राज्यातले सरकार आरोप प्रत्यारोप करत आहेत. ज्या काही राज्यातल्या योजना आहेत त्या तुम्ही चालू करा. मात्र हे योजना बंद करणारे सरकार आहे.आमच्या काळात होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांकडे आम्ही दुर्लक्ष करून आम्ही विकासाकडे लक्ष केंद्रीत करत होतो. मात्र विकासापासून लक्ष विचलित करण्यासाठी आरोप राज्य सरकारकडून प्रत्यारोप सुरू आहे, अशी टीकाही दानवेंनी केली.