अहमदनगर : शिर्डीमध्ये संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर निशाणा साधला होता. "विखे महसूल नव्हे आमसूल मंत्री" अशी टीका राऊतांनी केली होती. आता संजय राऊतांच्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलेय. संजय राऊत यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये नेण्याची गरज असल्याची बोचरी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 


राधाकृष्ण विखे पाटील यांची संजय राऊतांवर टीका -


खासदार संजय राऊत यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शिर्डी येथे निशाणा साधला. महानंदा डेअरी ही महाराष्ट्राची आहे आणि ती इथेच राहिली पाहिजे असे सांगत लवासाबद्दल श्वेत पत्रिका काढायला सांगणारे राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्राचे "महसूल मंत्री नसून आमसूल मंत्री" असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिउत्तर देत संजय राऊत यांना टोला लगावलाय. संजय राऊत यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे. संजय राऊत यांनी किती लोकांच्या प्रपंचात हस्तक्षेप करून देशोधडीला लावले, ही यादी आता मी जाहीर करणार आहे, असा इशारा त्यांनी दिलाय. मी आत्तापर्यंत जाऊ द्या म्हणलो काहीतरी पथ्य पाळले पाहिजे. मात्र आता वेळ आली आहे असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं आहे.


बेछूट आरोप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार - 


तलाठी भरतीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे बेछूट आरोप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हणत अप्रत्यक्षपणे रोहित पवार यांच्यावर टीका केलीये. तलाठी भरतीमध्ये आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप करणारे ट्विट रोहित पवारांनी केले होते. यावरून विखेंनी निशाणा साधला. तलाठी भरती पारदर्शक झालेली असून याच संस्थांमार्फत राज्यातील वेगवेगळ्या विभागाच्या 75 हजार जागांची भरती सुरू आहे. अतिशय पारदर्शक असलेल्या या भरती प्रक्रियेत कोणालाच हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे आपण कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत, विरोधकांकडून आर्थिक व्यवहार झाल्याची आरोप होत आहेत. आम्ही त्यांना खुलासा पाठवू, मात्र त्यानंतरही आरोप सुरू राहिले तर मात्र गुन्हे दाखल करणार असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. 


कोणत्याही चौकशीला तयार -


तलाठी भरती प्रक्रिया आणि नुकताच लागलेला तलाठी पेपरचा निकाल आता पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी, अशी मागणी केली. यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत. आम्हाला कोणतीही भीती नाही, जर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चौकशीची मागणी केली असेल तर तुमच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमकी असेल तर आम्ही त्यालाही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीये.


महानंदा डेअरीवर काय म्हणाले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील -


महानंद दूध डेअरी गुजरातमध्ये नेणार असल्याची फक्त चर्चा आहे. त्याबाबत कोणतेही तथ्य नसून जे आरोप करत आहेत. त्यांचा हा आरोप करण्याचा धंदा आहे. ठाकरे सेनेची युनियन तेथे आहे, तसेच या सेनेचे अध्यक्ष ठाकरे सेनेचे आमदार आहेत. त्यांनीच आरोप करणाऱ्यांना जाऊन सांगितले की, आरोप करण्यात काहीही तथ्य नाही. त्यामुळे हे महानंदावर आरोप बिनबुडाचे असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय.


राणी लंके लोकसभेसाठी मैदानात उतरणार ?


अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची पत्नी राणी लंके यांनी अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केलं होतं. यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निशाणा साधलाय. सध्या अनेक स्वयंघोषित उमेदवार असल्याच म्हणत त्यांना कोण थांबवणार? आपण महायुतीचा काम करत असून महायुती जो निर्णय घेईल तो निर्णय मान्य करणार असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.