नागपूर : जागावाटप खड्ड्यात गेलं, आधी शेतकऱ्यांचं बघा असे सांगत जनता युतीचा निर्णय जनता घेईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरातील सभेत म्हटले. सोबतच त्यांनी दुष्काळ, राम मंदिर, कांदा प्रश्न, राफेल घोटाळा, पीकविम्यासह अनेक मुद्द्यांवरून भाजप सरकारवर जोरदार फटकारे ओढले. मात्र तरीही भाजपकडून शिवसेनेची मनधरणी सुरूच आहे.

आगामी निवडणुकांमध्ये सेना-भाजपने एकत्र लढावे ही जनतेची इच्छा आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नागपुरात म्हटले आहे. अजून युतीची चर्चाच सुरू झाली नाही, तर जागा वाढवून मागणे हा सवाल उरतच नाही, असेही दानवे यावेळी म्हणाले.

राफेल घोटाळ्याबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांविषयी दानवे यांना विचारले असता आता कोर्टाचा निर्णय आला आहे, त्यामुळे विषयच उरला नाही, असे ते म्हणाले. सोबतच 90 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

काय म्हणाले उद्धव  ठाकरे 
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांनी पंढरपुरातील सभेत भाजपवर जोरदार टीका केली.  राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहे. असे असताना सगळे निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मात्र शेतकरी आणि दुष्काळासाठी काम करत आहे. जागावाटप खड्ड्यात गेलं, आधी शेतकऱ्यांचं बघा, असा इशारा  ठाकरे यांनी पंढरपुरातील सभेत दिला.  जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत असतात तिथे राष्ट्रीय पक्षाला धूळ चारली आहे असे सांगत त्यांनी भाजपला इशारा दिला आहे.

अयोध्येला कुंभकर्णाला जागे करायला  गेलो होतो, इथंही कुंभकर्णाला जागे करायलाच आलोय, असा टोलाही त्यांनी लगावला. 5 राज्याच्या निकालांनी सत्तांध लोकांना हादरा बसला आहे. त्यामुळे  कुंभकर्णा जागा हो, अन्यथा पेटलेला हिंदू तुला सोडणार नाही, असेही ठाकरे म्हणाले होते.  निवडणुका आल्या की ह्यांच्या अंगात देव घुमायला लागतो. आम्ही बावळट हिंदू नाहीत, अशा शब्दात भाजपला सुनावले.  तुम्ही कितीही क्लीनचिट वाटत फिरा, मात्र शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, असे ठाकरे म्हणाले होते.

हे सरकार पुन्हा आणीबाणी आणण्याचा प्रयत्न करतेय. जनतेच्या वैयक्तिक आयुष्यात घुसखोरी करत आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.  छत्तीसगडमध्ये जासी घाण खाली केली तशी महाराष्ट्रातली घाण खाली करा, असेही ते म्हणाले. गावागावातील शिवसेनेच्या शाखा शेतकऱ्यांचे आवाज केंद्र बनतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. नडण्याचा प्रयत्न करू नका, फोडून काढू, अशा शब्दात थेट इशारा ठाकरे यांनी दिला आहे.