नागपूर :  भाजप महाराष्ट्रात नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे अशा सामूहिक नेतृत्वामध्ये निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.  नागपुरात अमित शाहांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकांमध्ये कार्यकर्त्यांना पत्रक वाटण्यात आले आहेत. त्यात अमित शाहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या मार्गदर्शनात आपल्याला पूर्ण क्षमतेने विधानसभा निवडणुकांचा सामना करायचा आहे असं उल्लेख करण्यात आलं आहे.


 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकत नाही. तोवर कोणीही थकणार नाही, थांबणार नाही, विश्रांती घेणार नाही... आता सर्वांचा एकच लक्ष्य आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक.... असा उल्लेखही या पत्रकात करण्यात आला आहे. महाराष्ट्रात परीक्षेच्या काळात काही लोक आपल्याला चक्रव्युहात अडकवू पाहत आहे. मात्र आपल्याला तो चक्रव्यूह भेदायचा आहे असा कानमंत्र ही कार्यकर्त्यांना या पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुका संदर्भात काही सूचना आणि नियोजन बद्दलचा मार्गदर्शन ही कार्यकर्त्यांना लेखी स्वरुपात देण्यात आला आहे.


निवडणुकीत महिला व तरुणांच्या मतांवर भाजपचे लक्ष  


विधानसभा निवडणुकीत महिला व तरुणांच्या मतांवर भाजपचे लक्ष  असणार आहे. भाजप कोअर कमिटी बैठकीत युवा मोर्चा व महिला मोर्चांवर विशेष जबाबदारी असणार आहे. तरुण व महिलांची मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्याची व्यूहरचना आहे.  लाडकी बहीण व लाडका भाऊ योजनेचे लाभार्थी वाढवण्यासाठी  भर दिला जाणार आहे.  तरुण आणि महिलांसाठी असलेल्या योजनांचा प्रत्येक आठवड्यात आढावा घेतला जाणार आहे.  


अमित शाहांच्या उपस्थितीत बैठकीला नितीन गडकरींची अनुपस्थिती


 नागपुरातील  आढावा बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) अनुपस्थितीत राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे. नितीन गडकरी यांचे जम्मू-काश्मीर मधील निवडणूक प्रचाराचा नियोजित दौरा आहे. त्यामुळे स्थानिक भाजप खासदार आणि भाजपचे प्रमुख नेते असूनही गडकरी या कार्यकर्ता संवाद बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र,नितीन गडकरींची अनुपस्थितीमुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चेला उधाण आले असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात नितीन गडकरी यांना लांब तर ठेवले जात नाहीये ना? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. शिवाय या बैठकीनंतर नितीन गडकरी यांच्याकडे महाराष्ट्राच्या निवडणुकीची किती धुरा हातात राहतील याबद्दल देखील प्रश्नचिन्ह कायम असल्याचे बोलले जात आहे. 


हे ही वाचा :


Nitin Gadkari : गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीतील आढावा बैठकीला नितीन गडकरींची अनुपस्थिती; चर्चेला उधाण, नेमकं कारण काय?