मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपची महाजनादेश यात्रा सध्या विदर्भात आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात महाजनादेश यात्रेद्वारे भाजपचा प्रचार सुरु आहे. ही यात्रा अकोल्यात पोहोचली असून त्यासंदर्भात बार्शीटाकळीच्या भाजप कार्यालयात बैठक झाली. या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी 'मुंगळा' गाण्यावर ठेका धरला.
या पदाधिकाऱ्यांमध्ये बार्शीटाकळीचे भाजपचे तालुकाध्यक्ष अविनाश महल्ले, विस्तारक गौवर्धन काकड, सरचिटणीस गणेश झळके, सरचिटणीस सुनील थोरात, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गजानन लुले आणि मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरिश पिंपळे यांचे स्वीय सहायक निलेश हांडे यांचा समावेश आहे. बैठकीनंतर झालेल्या पार्टीत त्यांनी हा डान्स केल्याचं म्हटलं जात आहे.
महत्त्वाचं म्हणजे अन्याय झाल्याचा आरोप करत अकोल्यात सहा शेतकऱ्यांनी कालच जिल्हाधिकारी कार्यालयात विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. तर कालच महाजनादेश यात्रेच्या बैठकीनंतर भाजप पदाधिकारी थिरकताना दिसले. त्यामुळे 'पार्टी विथ डिफरन्स'चा दावा करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचं नवं रुप या माध्यमातून समोर आलं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.