परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वात बैठक का घेतली म्हणून भाजप तालुकाध्यक्षाने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यास घरात घुसून मारहाण केली आहे. या प्रकरणी भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश देशमुख यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे

दोन दिवसांपूर्वी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात तालुक्यातील पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक आमदार राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वात बैठक का घेतली याचा राग धरून भाजप परभणी तालुकाध्यक्ष राजेश देशमुख व इतर 5 जणांनी काल रात्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांना फोन करून घराबाहेर येण्याचे सांगून बेदम मारहाण केली.

भाजप तालुकाध्यक्ष राजेश देशमुख

मारहाण होत असताना ढोकणे घरात गेले असता घरात घुसून देखील त्यांना मारहाण करण्यात आली. ढोकणे यांनी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश देशमुख यांच्यासह इतर 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं आहे.