Nitesh Narayan Rane : ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनाची बैठक मंगळवारी, 16 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. राणेंच्या हातातून पालकमंत्री गेल्यानंतर जिल्हा नियोजन बैठक नेहमीच वादळी ठरत आहे. आता तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी होणारी नियोजन बैठक वादळी होणार असल्याचे संकेत दिले आहेत. जिल्हा परिषदेचा विकास निधी परत केला जात असल्याने ही बैठक वादळी ठरणार आहे. जिल्हा नियोजनचा निधी नियमबाह्य पध्दतीने वितरित करणे, पालकमंत्री उदय सामंत यांच्या नातेवाईकांचा जिल्ह्यातील कारभारात ढवळाढवळ, जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, जिल्ह्यात अनधिकृत व नियमबाह्य काम सुरू असल्याचे आरोप करत आमदार नितेश राणे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदुर्ग जिल्हाचे पालकमंत्री उदय सामंत यांचा एकेरी उल्लेख केला. तसेच पालकमंत्र्यांना घाम फोडल्याशीवाय "तो काय" रत्नागिरीला परत जात नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी दोन वेळेचा डब्बा घेऊन नियोजन बैठकीत यावं. फुलपाखरासारखं आलं आणि गेलं तसं काही होणार नाही, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलेय.


मंगळवारी होणाऱ्या या बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर जिल्हाधिकारी के. मंजुलक्षमी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत तसेच जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत. तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा नियोजन बैठक होत आहे. त्यात ही बैठक वादळी होणार असल्याचे संकेत आमदार नितेश राणे यांनी दिले आहेत. विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांचा कालावधी आता संपत आहे. यामुळे या नियोजन समितीमध्ये सदस्य असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांची ही अखेरची नियोजन बैठक आहे. जानेवारीमध्ये झालेल्या सभेमध्ये आगामी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 250 कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला होता.


सिंधुदुर्ग जिल्हा विकासासाठी नियोजन सभेत 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 250 कोटींचा आराखडा प्रस्तावित केला होता. राज्याने यातील 80 कोटी रुपयांना कात्री लावत 170 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. हा 170 कोटींचा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त झाला असून उद्याच्या नियोजन बैठकीत या निधीच्या कामांना मंजुरी दिली जाणार आहे. हा निधी खर्च करण्यासाठी पुढे चार महिने शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे या मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया प्रत्यक्ष कामे करणे. त्यामध्ये अधिकाऱ्यांची खरी कसोटी लागणार आहे. मात्र जिल्ह्यातील विकासकामांपेक्षा जिल्ह्यात राजकीय लोकप्रतिनिधी एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. तसेच आपली राजकीय पोळी भाजून घेताना दिसतात.


भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत समाचार घेतला. गोंधळ घालणं त्यांच्या पाचवीला पूजलेलं आहे, असं नाव न घेता नितेश राणेंवर टीका केली. तोडून टाकू, मोडून टाकू, हे करू देणार नाही, ते करू देणार नाही यासाठी त्यांचा जन्म असल्याचं म्हटलं आहे. मात्र पालकमंत्री उदय सामंतांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने विकासाचा आराखडा तयार केला जात आहे तो स्तुत्य आहे. असल्याचं यावेळी म्हणाले.