रत्नागिरी : कोरोनाच्या काळात सध्या सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे. राजकीय पक्षांचे नेते देखील यात कुठे मागे नाहीत. आपल्यापरिनं जमेल ती मदत सध्या केली जात आहे. त्यामुळे अनेकवेळा राजकीय नेत्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. भाजप नेते प्रसाद लाड देखील कोकणात येतात आणि साऱ्या परिस्थितीचा आढावा घेतात. याबाबत त्यांना 'एबीपी माझा'ने प्रश्न विचारले असता त्यांनी ' असे असल्यास मदत घेऊ नका' असं धक्कादायक वक्तव्य केले. त्यानंतर त्यांच्यावर पत्रकार परिषदेत अनेक पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. पत्रकारांची नाराजी लक्षात घेत प्रसाद लाड यांनी सारवासारव करण्याचा देखील प्रयत्न केला. रत्नागिरीतील शासकीय विश्रांतीगृह येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा आता सुरू झाली आहे.


काय होता प्रश्न, काय बोलले प्रसाद लाड?


मुंबई रेड झोनमध्ये येते. त्यामुळे रेडझोनमधून रत्नागिरी जिल्ह्यात येताना क्वारंटाईनचे नियम देखील आहेत. सामान्य नागरिकांना वेगळा नियम आणि राजकीय नेते मंडळी, आमदार, खासदार यांना वेगळा नियम का? असा प्रश्न 'एबीपी माझाने' केला होता. त्यावर बोलताना 'असं असल्यास मदत देखील स्वीकारू नका' असं  प्रसाद लाड यांनी म्हटलं. त्यानंतर त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत पत्रकारांनी देखील नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रसाद लाड यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या या बेजबादार वक्तव्यावर आता नाराजी देखील व्यक्त केली जात आहे.


काय आहे जिल्ह्यात कोरोनाची स्थिती?


रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या ही 10वर पोहोचली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मागील दोन दिवसामध्ये 4 नव्या रूग्णांची भर पडली आहे. चारही रूग्ण हे मुंबई येथून आलेले आहेत. मंडणगड, संगमेश्वर आणि चिपळूण या ठिकाणी कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत.यापूर्वी शनिवारी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातून 3 कोरोना रूग्णांना उपचाराअंती सोडून देण्यात आले आहे. त्यामध्ये एका सहा महिन्याच्या बाळाचा देखील समावेश होता. परिणामी जिल्हा रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या शून्य झाली होती. पण, नव्याने दाखल झालेल्या रूग्णांची संख्या ही चार आहे. तर, खेडमधील एका रूग्णांचा मृत्यू झाला होता.