Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी वादाच्या भावर्‍यात आडकलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांनी आता अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या हल्‍ल्या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयानं नितेश राणेसंह अन्य एकाचा अटकपूर्व  जामीन फेटाळला आहे. त्या निकालाल राणे यांच्यावतीनं अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्या अर्जावर न्यायमूर्ती सी.व्ही. भडंग यांच्यासमोर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे.


विधानभवनाच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरेंना म्याँव म्याँव करून चिडवल्यानंतर अवघ्या काही तासांत हा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे निव्वळ राजकीय सूडबुद्धीनं आणि सरकारचा दबाव असल्यानं या प्रकरणात आपल्याला गोवलं जात असल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी आपल्या अर्जात केला आहे.


सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीच्या रणधुमाळीत सतिश सावंत यांच्या पॅनलचे निवडणूक प्रचारक संतोष परब यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला. हा हल्ला आमदार नितेश राणे यांच्या सांगण्यावर झाल्याचा आरोप करून तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केल्यानंतर अटकेची शक्यता निर्माण झाल्याने नितेश राणे आणि गोट्या सावंत यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावलेत. या अर्जावर दोन दिवस युक्तीवाद झाल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. 


काय आहे प्रकरण? 


18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा