Maharashtra Agricultural Budget 2021 : नवी मुंबईतील भाजपाचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक महाविकास आघाडीविरोधात शेरेबाजी करत असताना दुसरीकडे भाजपा बेलापूर मतदार संघातील आमदार मंदा म्हात्रे मात्र सरकारचे कौतुक करताना दिसत आहेत. यामुळे नवी मुंबईतील कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. पण दुसरीकडे शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी मंत्र्याकडे जायला काय हरकत आहे? असा प्रश्न मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.


नवी मुंबईतील गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांचे नाते गेल्या अनेक वर्षापासून अगदी विळ्या भोपळ्याचे राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोघे एकत्र असतानाच सुरू झालेले शितयुध्द दोघे भाजपात आल्यानंतरही संपलेले नाही. नवी मुंबई महानगर पालिका निवडणूका कधीही लागण्याची शक्यता असूनही गणेश नाईक यांना मंदा म्हात्रेंकडून घरचा आहेर मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 


आज राज्य सरकारकडून बजेट जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईतील महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी 100 कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिर केले. आमदार मंदा म्हात्रे यांनी गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबईत भवन उभारावे यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश येताच त्यांनी मिडीयाला सामोरे जात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे तोंडभरून कौतुक केले. एकीकडे विरधी पक्ष असलेल्या भाजपाने राज्य सरकारने सादर केलेल्या बजेटवर जोरदार टिका केली असतानाच भाजपाच्या आमदार असलेल्या मंदा म्हात्रे यांनी कौतुक केल्याने एकच चर्चा सुरू झाली. महानगर पालिका निवडणूका तोंडावर आल्या असल्याने मंदाताई वेगळा विचार करीत आहेत का या चर्चेने जोर धरला आहे. मात्र या  चर्चेचे खंडन करीत आपल्या मतदार संघातील कामे मंजूर झाल्याने आपण सरकारचे कौतुक केले असल्याचे मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.


विशेष म्हणजे मंदा म्हात्रे यांच्याकडून मविआचं कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही.  याआधीही त्यांनी अनेक वेळा उध्दव ठाकरे आणि अजित पवार यांची भेट घेतली आहे. शहरात भव्य असे शासकीय रूग्णालय आणि वैद्यकीय काॅलेज उभारण्यासाठी सिडको कडून 10 एकरचा भूखंड मिळविण्यासाठी उध्दव ठाकरे यांची मंदा म्हात्रे यांनी भेट घेतली होती. यानंतर सिडकोने रूग्णालयासाठी भूखंड राखीव ठेवला. सिबीडी ते मुंबई वॅाटर टॅक्सी गेल्या महिन्यात सुरू झाली होती. मात्र दर जास्त असल्याने ते कमी करण्याची मागणी मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. ही मागणी मान्य करीत सरकारने पुढील तीन वर्ष घेण्यात येणारा 30 टक्के नफा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने आता दर कमी होण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्र भवन होणार असल्याने आपल्या बेलापूर मतदार संघातील अनेक प्रश्न महाविकास आघाडी सरकार पूर्ण करीत असल्याने आपण त्यांचे कौतुक करीत असल्याचे मंदा म्हात्रे यांनी सांगितले आहे. दरम्यान या सर्व बाबतीत ऐरोलीचे भाजपा आमदार गणेश नाईक यांनी काहीच प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha