अमरावती : विदर्भातील जनतेने अमरावती, बुलडाणा आणि अकोल्यातील शिवसेनेचे खासदार आणि आमदारांना ‘चले जाव’चा नारा देत, वेगळा विदर्भाच्या मागणीसाठी जोर धरावा, असं आवाहन भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केलं आहे.
अमरावतीमध्ये शेतकरी आत्मबळ यात्रेदरम्यान ते माध्यमांशी बोलत होते. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आशिष देशमुख यांनी स्वतःच्याच पक्षाविरोधात दंड थोपटले आहेत. आशिष देशमुख हे काटोल येथील आमदार असून विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये आत्मबळ निर्माण व्हावं, यासाठी विदर्भातील अकराही जिल्ह्यात यात्रा करत आहेत.
आगामी निवडणुकीत भाजपशी युती करणार नसल्याचं शिवसेनेने जाहीर केलं आहे. भाजप वेगळ्या विदर्भाच्या बाजूला असताना शिवसेनेचा त्याला विरोध होता. मात्र आता भाजपची गले की हड्डी निघाली असून भाजपने आता तरी वेगळा विदर्भ करावा, अशी मागणी भाजप आमदार आशिष देशमुख यांनी पुन्हा एकदा केली.
विदर्भातील कापूस उत्पादक संकटात असताना राज्य सरकारचा कृषी विभाग मात्र शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील आहे. हा विभाग मृत अवस्थेत असल्याची टीका स्वतःच्या पक्षातील कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यावर आशिष देशमुख यांनी केली.