अहमदनगर : भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतलाय. संजय राऊत यांना ED ची नोटीस बजावण्यात आली आहे. राजकीय सूडबुद्धीने ही नोटीस पाठवली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. मात्र हे चुकीचं असून ED चौकशी लागल्याने संजय राऊत यांचं घबाड उघडं पडेल या भीतीने त्यांच्या बुद्धीचे लक्तरे उघड होत आहेत, अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे. इतकेच नाही तर संजय राऊत यांच्याकडे बोलण्यासारखे काही राहिले नसून काँग्रेसच्या नसीम खानने संजय राऊत यांना एवढे फटकरले आहे की त्यांना जाग येणार नाही, असा टोलाही राम शिंदे यांनी लागवला आहे.
संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून शरद पवार यांचे कौतुक करत UPA चे नेतृत्व शरद पवारांनी करावं असं म्हटलं. मात्र संजय राऊत हे UPA चे प्रवक्ते कधी झाले हे पाहावे लागेल अशी कोपरखळी राम शिंदे यांनी मारली. बिहारमध्ये निवडणूक लढवली तर 2 अंकी संख्या पण नाही मिळाली, त्यामुळे संजय राऊत यांनी आपलं बघावं दुसऱ्याचं सांगायची आवश्यकता नाही अशी टीका राम शिंदे यांनी केली.
'ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय', भाजपचं शिवसेनेला प्रत्युत्तर
यावेळी बोलताना राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी 30 लाखाचे बक्षीस जाहीर केले. मात्र असे बक्षीस जाहीर करणे म्हणजे लोकांना दिलेले प्रलोभन असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे, अशी प्रतिक्रिया राम शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे याची राज्य निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवडणुकीत प्रलोभने दाखवणे, लोकांवर दबाव तंत्र वापरणे, पैशाचा वापर करणे, हे गैर असून भविष्यात टाटा, बिर्ला आमदार-खासदार होतील असे राम शिंदे यांनी म्हटलं.
'शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला?', 'सामना'तून भाजपवर जहरी टीका