रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर सध्या राज्याच्या राजकारणात परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय आहे. यामध्ये अनिल परब नारायण राणे यांच्या अटकेविषयी काहीतरी बोलत आहेत. त्यावरून शिवसेनेनं सुडबुद्धीनं ही कारवाई केली असल्याचा आरोप भाजप करत आहे. दरम्यान, याच मुद्यावरून भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी थेट उदय सामंत आणि भास्कर जाधव यांचं नाव न घेता परब यांचा घात केल्याचा आरोप केला आहे. 


अनिल परब जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजर होते. यावेळी त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला भास्कर जाधव आणि उदय सामंत देखील बसले होते. याचवेळी नारायण राणे यांच्या अटकेबाबत अनिल परब फोनवर बोलत होते. हे सारं कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं. 'यावेळी नेमका माईक कुणी सुरू केला? अनिल परब यांचा घात कुणी केला? उजव्या की डाव्या बाजूच्या माणसानं?' असा सवाल जठार यांनी भास्कर जाधव आणि उदय सामंत यांचं नाव न घेता केला आहे. 


जनआशीर्वाद यात्रा, नारायण राणेंचा दौरा एकाच दिवशी


दरम्यान, नारायण राणे यांच्या नियोजित दौऱ्यानुसार राणे रत्नागिरी दाखल होणार होते त्याच दिवशी जिल्हा नियोजन समितीची देखील बैठक आयोजित केली होती. ही बैठक जाणीवपूर्वक आयोजित केली होती. यामध्ये राणेंना डिवचण्याचा डाव होता. तसेच कुणीही अधिकारी यावेळी हजर राहणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली होती. अशी चर्चा देखील रत्नागिरी जिल्ह्यात सुरू होती. पण, जनआशीर्वाद यात्र संगमेश्वर येथे आल्यानंतर राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.


सीबीआय चौकशीची मागणी


या साऱ्या घडामोडीनंतर आता अनिल परब भाजपच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी सध्या या साऱ्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. 


जन आशीर्वाद यात्रा शुक्रवारपासून सुरु


साऱ्या राजकीय घडामोडीनंतर जन आशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली होती. पण, हीच यात्रा आता रत्नागिरीमधून 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मोठ्या धुमधडाक्यात ही यात्रा मंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू होईल अशी माहिती यावेळी प्रमोद जठार यांनी दिली आहे.