जळगाव : आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होता. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का? असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. नाथाभाऊ अन्याय सहन करणार नाही. स्वस्थ बसणार नेता नाही. मला न्याय मिळत नाही तो पर्यंत मी पक्षाला प्रश्न विचारणार आहे, असं खडसे म्हणाले.
खडसे यांच्यावर सुनील नेवे यांनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सगळे म्हणतात नाथाभाऊ चांगले मग तिकीट का दिले नाही. मुख्यमंत्री होऊ शकलो नाही याचे दुःख नाही. उत्तर महाराष्ट्राला कधीही मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. खडसे म्हणाले की, मी आजपर्यंत पक्षाच्या विरोधात, नेत्याच्या विरोधात कधीही बोललो नाही. मला देवेंद्रजींकडून त्रास झाला म्हणून बोललो. पार्टीच्या विरोधात कधीही बोलणार नाही
लवकरच 'नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान' पुस्तक लिहिणार
लवकरच 'नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान' हे पुस्तक लिहिणार असून त्यातून अनेक गोष्टी उघड करणार असल्याचं खडसे म्हणाले. खडसे म्हणाले, दोन चार राजे लाचार झाल्याने इंग्रज बळकट झाले होते. हा इतिहासाशी मिळता जुळता कार्यक्रम आहे. यावेळच्या वाढदिवस सुनील नेवे यांच्या पुस्तका मुळे लक्षात राहील, मी पुस्तक लिहिण्याएवढा मोठा नाही, मात्र त्यांच्या प्रेमाने लिहिलं आहे. तुमच्या मनात असलेले हे पुस्तक नाही ते अजून यायचं आहे. दाऊदच्या बायकोवरुन सोबत आरोप केले. मनीष भंगाळेला सन्मानाची वागणूक दिली जाते. आता सगळे पुरावे मला मिळाले आहेत. नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान हे पुस्तक लिहिणार आहे. त्यात सगळे मी लिहिणार आहे, असं खडसे म्हणाले.
मी चांगला, तर मग मला तिकीट का दिलं नाही?
भाजप नेत्यांनी मी चांगला असल्याचं म्हटलं. मग मला तिकीट का दिलं नाही? हा प्रश्न मला आहे. माझा आवाज का बंद केला, ते शोधण्याचा प्रयत्न करतो आहे, असं खडसे म्हणाले. भाजपचा चेहरा मोहरा बदलण्याचा काम आमच्या काळातील नेत्यांनी केलं. आज मात्र चित्र वेगळं आहे. नाथाभाऊवर अन्याय का असा प्रश्न पडतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सेना भाजपची युती नसताना यश मिळवून दिले. मुंडे हयात असते तर महाराष्ट्राच चित्र आज दिसत आहे ते दिसले नसते. गोपीनाथ आणि एकनाथ एक आहेत अशी गोपीनाथ यांची भूमिका होती, असं ते म्हणाले.
मला सर्वच पक्षाच्या ऑफर
खडसे म्हणाले की, पक्षात आरोप झालेल्या सगळ्यांना क्लिन चिट मात्र मला दिली नाही. मला सर्वच पक्षाच्या ऑफर आहेत. मी महाराष्ट्रातील जनतेला विचारणार आहे,की मी पुढे काय करावं. मी पक्षाच्या विरोधात कधी बोललो नाही. फक्त देवेंद्र फडणवीस यांचा त्रास झाला म्हणून त्यांचं नाव मी घेतो. सरकार आलं असतं पण यांच्यामुळे आलं नाही. मला अस बोलू नका म्हणतात, पण चुकीच्या निर्णयाचा विरोध करण्याची धमक ज्यांच्यात असते तेच स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. एकटं पडण्याची भीती गुलामांना असते, असं खडसे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
एकनाथ खडसे यांचे देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा गंभीर आरोप
'10-15 वर्षांपूर्वी पक्षात आलेले नेते आम्हाला अक्कल शिकवायले' : एकनाथ खडसे