जळगाव : दहा पंधरा वर्षांपूर्वी पक्षात उदयास आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत, अशा शब्दात भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षातील नेत्यांवर नाव न घेता हल्लाबोल केलाय. आपल्या 68 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता पुन्हा एकदा संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळाले आहे. 'राज्यात मी पुन्हा येणार ,मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार' हे जनतेला आवडलं की नाही याचा आता मी शोध घेणार असल्याचं म्हणत खडसे यांनी टोला लगावला.
खडसे म्हणाले की, एकेकाळी पक्षाला प्रतिकूल परिस्थिती असतानाही गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा सर्व नेत्यांनी मोठी मेहनत घेऊन पक्ष उभारणी केली होती. मागच्या वेळेस तर युती नसतानाही एक हाती सत्ता राज्यात मिळाली होती. आता केंद्रात आपलं सरकार होतं, राज्यात अनुकूल परिस्थिती होती. मात्र या अशा नेत्यांमुळे सर्व वातावरण अनुकुल असतानाही पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे, असं खडसे म्हणाले.
माझ्यावर अन्याय केल्याची भावना आणि संताप कार्यकर्त्यांमध्ये, कधीतरी याचा स्फोट होऊ शकतो
मी गेली चाळीस वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. मात्र पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना आणि संताप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याचा कधी तरी स्फोट होऊ शकतो असं मला वाटतं. भाजपसह सर्वच पक्षात मला मानणारा कार्यकर्ता आहे. कोरोनाचं सावट दूर झाल्यावर मी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. यासाठी नेहमीप्रमाणे सर्व राज्यभर दौरा करणार आहे. राज्यातील अनेक पक्षांनी मला त्यांच्या पक्षात येण्यासाठी आवाहन केलं होतं. मात्र गेली चाळीस वर्षे ज्या पक्षाशी मी एकनिष्ठ राहिलो, त्या पक्षाला सोडून जावं असा कधीही मनात विचार आला नसल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.
आघाडी सरकारकडे सध्या आवश्यक संख्याबळ
सध्याच्या आघाडी सरकारचा विचार केला तर अजून एक दीड वर्ष उलथापालथ होईल असं आपल्याला वाटतं नाही. कारण आघाडी सरकारकडे सध्या आवश्यक संख्याबळ आहे. भाजपला जर सत्तेत यायचा असेल तर केवळ काही आमदार फोडून चालणार नाही, तर एखादा पूर्ण पक्ष भाजपमध्ये यायला पाहीजे. मात्र ही भाबडी आशा आहे, सध्या तरी असं होईल अशी परिस्थिती नाही, असं सांगत खडसे यांनी भाजपची पोलखोल केली आहे