गेल्या काही दिवसांपासून रोज पत्रकार परिषदा घेऊन शिवसेनेची भूमिका परखडपणे मांडणारे फायरब्रँड नेते संजय राऊत सध्या रुग्णालयात दाखल आहेत. संजय राऊत यांना काल (11 नोव्हेंबर) दुपारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राऊत यांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये 2 ब्लॉक होते. राऊत यांच्यावर डॉक्टर अजित मेनन यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी करण्यात आली. राऊत यांच्या रक्तवाहिनीमध्ये तीन स्टेन टाकण्यात आले आहेत, असे त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर सकाळपासून विविध पक्षाचे नेते लीलावती रुग्णालयात येऊन राऊत यांची भेट घेत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, माजी आमदार हर्शवर्धन जाधव आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी राऊत यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर शेलार यांनी एबीपी माझाशी संपर्क साधला.
काय म्हणाले आशिष शेलार?
कितीही वैचारीक मतभेद असले तरीही एकमेकांच्या तब्बेतीची विचारपूस करणे ही महाष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. त्यामुळंच आमचे मित्र संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी मी इथे आलो होतो. अशा परिस्थिती त्यांनी कमी बोलावं, अशी आमची इच्छा असल्याचेही ते म्हणाले. गेल्या काही दिवासांपासून संजय राऊत रोज पत्रकार परिषदा घेऊन भाजपच्या तोंडचे पाणी पळवले होते. कदाचित त्यामुळंच शेलार यांनी हा सल्ला दिला नसेल ना? अशा प्रश्न उपस्थित होत आहे.