सोलापूर : निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस राष्ट्रवादीमधील काही साखर सम्राटांना काही आश्वासनं देऊन भाजपमध्ये घेतले. पक्षप्रवेशावेळी भाजपने दिलेल्या आश्वासनांची आता पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. पंढरपूरमधील कल्याणराव काळे, कोल्हापूरमधील धनंजय महाडिक आणि वारणा कारखान्याच्या विनय कोरे यांना त्याचा फायदा मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने पंढरपूरमधील काँग्रेसचे साखर सम्राट कल्याणराव काळे यांना भाजपात प्रवेश देत माढा आणि सोलापूर लोकसभा जागा जिंकण्यात त्यांचा वापर करून घेतला होता. कल्याणराव काळे पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे, मात्र गेल्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, परंतु ऐनवेळी तिकीट कापले गेल्याने त्यांनी पुन्हा काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवत तब्बल 70 हजार मतं मिळविली होती. या लोकसभा निवडणुकीपूर्वी काळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. लोकसभा विजयानंतरदेखील त्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न होऊ शकल्याने कल्याणराव काळे समर्थकांत अस्वस्थता पसरली होती. अडचणीत आलेल्या साखर कारखान्याला लागणारी आर्थिक मदत करावी, अशी काळे यांची मागणी होती. आता आचारसंहितेपूर्वी राष्ट्रीय सहकार विकास निगमाकडून कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्यास 75 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

कल्याणराव काळे यांच्याकडे असलेली सहकाराची ताकद आणि मोठा कार्यकर्ता संच यामुळे भाजपाला लोकसभा निवडणुकीत काळे यांचा फायदा झाला. तसेच पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आणि माढा हे मतदारसंघ जिंकण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. कल्याणराव काळे यांच्यामुळे पंढरपूर, सांगोला आणि माढ्याचा विजय भाजपाला दिसू लागला आहे. त्यामुळे काळे यांना दिलेला शब्द पूर्ण करत मुख्यमंत्र्यांनी मोठे गणित घातले आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी खासदार धनंजय महाडिक यांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला आणि 15 दिवसात त्यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्यास 85 कोटींची मदत मिळाली आहे. महाडिक यांचा भीमा सहकारी साखर कारखाना मोहोळ तालुक्यात असून त्यांचा भीमा परिवारदेखील भाजपाला मोहोळ विधानसभा जिंकण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या खेळीने काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला सोलापूर जिल्हा भाजपच्या ताब्यात येणार असून विधानसभा निवडणुकीपूर्वी साखर सम्राटांना खुश करत केलेली शब्दपूर्ती भलतीच फायदेशीर ठरणार आहे.