Shivsena BJP : महाविकास आघाडीचे सरकार पडणार असल्याचे मुहूर्त सांगणारे ज्योतिष भाजपने बदलले. मात्र, सरकार अजून स्थिर असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले. तेढ निर्माण झाल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार आणि गृह विभाग सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले. गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई वाशिम येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राणा दाम्पत्याने हनुमाना चालिसा पठणाच्या मुद्यासह ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जून महिन्यात महाविकास आघाडीच सरकार कोसळणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरही देसाई यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, कुणाला काय पठण करायचं, चालीसा मंत्र पठन करायचं त्यांनी आपल्या घरी किवा खाजगी ठिकाणी करावं. मात्र, मातोश्री निवासस्थानी करणार आणि आव्हान देणार असेल तो अधिकार कुणाचाही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकांचे हेतू काय आहेत, हे कळून येत असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपने सरकार पाडण्याचा मुहूर्त सांगणारे ज्योतिष बदलले आहेत. मंत्रिमंडळाच्या खाते वाटपापूर्वी सरकार पडणार असल्याचे सांगत होते. त्यानंतर दोन महिन्यात, कुणी सहा महिन्यात सरकार पडणार असल्याचे भविष्य सांगितले. मात्र अडीच वर्ष होऊन गेले. मात्र सरकारवर किंचितही परिणाम झाला नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सरकार पाडण्याचा मुहूर्त सांगायचे. त्यांचा मुहूर्त लागू पडेना म्हणून राणे आता मुहूर्त सांगणार गुरुजी झाले. मात्र, त्यांचाही मुहूर्त फसवा निघणार असल्याचे देसाई यांनी म्हटले.
राज ठाकरे यांच्या सभेवर बोलताना राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बोलताना सांगितले की, राज्यातील कायदा आणि सुव्यस्था राखण्याची जबाबदारी पोलीस दलाची आहे. राज्यात कोणाची कुठे सभा होत आहे. कोणत्या सभेत कुठे कोण काय बोलतोय. यापेक्षा कुणाच्या वक्तव्या मुळे वाद निर्माण होत असेल, समाजात तेढ निर्माण होत असेल तर ती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार आणि गृह विभाग सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले.